नवी दिल्ली: बहुप्रतीक्षित वेगवान ५जी दूरसंचार सेवा सुमारे पुढील महिनाभरात सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी सोमवारी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात देशातील निवडक १३ शहरांमध्ये या सेवेचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या ‘प्रादेशिक मानकीकरण मंच (आरएसएफ)’च्या उद्घाटन कार्यक्रमात, चौहान यांनी ५ जी सेवेच्या मुहूर्तासंबंधाचे संकेत देतानाच, या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सेवांसाठी आवश्यक स्वदेशात विकसित आणि उत्पादित ५ जी दूरसंचार गीयर्सदेखील वर्षअखेपर्यंत तैनात केले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

भारतीय अभियंत्यांनी ५जी मानकांचा संच विकसित केला आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात ५ जीच्या जाळय़ाचा प्रसार सुलभ होईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, सरकार स्वदेशी बनावटीच्या, स्वदेशात विकसित आणि उत्पादित प्रगत दूरसंचार तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज भारतामध्ये एक मजबूत ५ जी मोबाइल कम्युनिकेशन परिसंस्था उभी राहताना दिसत आहे. मागील सोमवारी, १ ऑगस्टला संपलेल्या दूरसंचार ध्वनिलहरींच्या देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा लिलावात विक्रमी दीड लाख कोटी रुपयांची बोली लावली गेली.  मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओसह, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या तीन मुख्य स्पर्धकांसह, गौतम अदानी यांच्या अदानी डेटा नेटवर्क्‍स या कंपनीने या लिलावात सहभाग घेतला.