नवी दिल्ली :केंद्र सरकारचे उद्योगपूरक धोरण आणि पाठबळामुळे २०१६-१७ मध्ये अवघी ७२६ असलेली नोंदणीकृत नवउद्यमींची (स्टार्टअप) उपक्रमांची संख्या चालू आर्थिक वर्षांत २० जुलैपर्यंत ७२,९९३ वर पोहोचली असून त्यातून ७.६८ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती झाली आहे, अशी माहिती बुधवारी देण्यात आली.

सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या उपक्रमांमुळे नवउद्यमींसाठी अनुकूल वातावरणनिर्मिती झाली आहे आणि देशात ‘युनिकॉर्न’ची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. यात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला असून एकटय़ा महाराष्ट्रात १.४६ लाखांहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. यापाठोपाठ नवउद्यमींचे माहेरघर समजले जाणाऱ्या कर्नाटकमधील ‘टेक सिटी’ बंगळूरुमध्ये १.०३ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. तर त्यापाठोपाठ दिल्ली ८७,६४३ नोकऱ्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ६७,६९४ नोकऱ्यांसह उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे.

गेल्या सहा वर्षांत नोंदणी केलेल्या नवउद्यमींच्या संख्येत, महाराष्ट्र पुन्हा १३,५१९ नवउद्यमींसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक ८,८८१, दिल्ली ८,६३६ आणि उत्तर प्रदेश ६,६५४ नवउद्यमींसह चौथ्या स्थानावर आहे, असे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरादाखल स्पष्ट केले.

देशभरात ६४० हून अधिक जिल्ह्यांमध्ये नवउद्यमी उपक्रम पसरले आहेत.

तिसऱ्या स्थानी झेप

नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमशीलतेत भारताने जगात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून प्रत्येक महिन्यात नवनव्या ‘युनिकॉर्न’ची भर पडत आहे. नवउद्यमी उपक्रमशीलतेत ‘युनिकॉर्न’ म्हणजे एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली जाणे असून, हा यशाचा महत्त्वाचा टप्पा गाठणाऱ्या नवउद्यमींच्या संख्येने भारतात शतकी टप्पा गाठला आहे. तथापि यापैकी केवळ २३ नवउद्यमी उपक्रम हे नफ्यात आहेत.