नवी दिल्ली : आर्थिक स्थिरता आणि विकासासाठी अचूक आणि विश्लेषणात्मक लेखापरीक्षण अहवाल अत्यावश्यक असून, त्यांच्या माध्यमातून जनतेत विश्वासाचे वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी केले.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी तर उद्यम सुशासनाचा आधारस्तंभच लेखापरीक्षण अहवाल असतो, अशी स्पष्टोक्ती दास यांनी ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ ऑडिट अँड अकाउंट्स (एनएएए)’ या संस्थेच्या अधिकारी वर्गापुढे बोलताना केली.

सार्वजनिक संसाधनांचा वापर हा जबाबदारीने, लक्ष्यित परिणाम साध्य करण्यासाठी होत आहे आणि संसाधने प्रभावीपणे व्यवस्थापित केली जातात की नाही याचे नि:पक्षपाती आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन हे निष्पक्ष आणि अचूक लेखापरीक्षण अहवालातून प्रदान केले जाऊ शकते. असे अहवाल भागधारक जनतेत विश्वासाची भावना वाढवतात, असे दास म्हणाले.

निष्पक्ष लेखापरीक्षण ही केवळ देशांतर्गत चिंतेची बाब राहिलेली नसून, तर उत्तरोत्तर एकात्मिक बनत आलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेची ती महत्त्वाची गरज आहे. जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढविण्याचे हे एक प्रमुख साधन असल्याचे निरीक्षण गव्हर्नरांनी नोंदविले. वित्तीय बाजाराची वाढती गुंतागुंत आणि उपलब्ध स्रोतांच्या कार्यक्षम वाटपाबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने, लेखापरीक्षणाची भूमिका आणखी महत्त्वाची बनली असल्याचे त्यांनी नमूद केले.