नवीन ग्राहक जोडण्यास रिझव्‍‌र्ह बँकेची मनाई

मुंबई : देयक पद्धती माहिती साठवणुकीबाबतच्या नियमांच्या उल्लंघनाच्या प्रकरणी ‘मास्टरकार्ड’वर कारवाई करताना, रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी त्या कंपनीला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई करणारा आदेश दिला. परिणामी अमेरिकी कंपनीला येत्या २२ जुलैपासून त्यांचे नवे क्रेडिट, डेबिट तसेच प्रीपेड कार्ड भारतात वितरित करता येणार नाहीत.

अडीच महिन्यांपूर्वीच रिझव्‍‌र्ह बँकेने माहिती साठवणुकीच्या उल्लंघनाच्या अशाच प्रकरणात अमेरिकन एक्स्प्रेस व डायनर्स क्लबवर देखील कारवाई केली होती. कारवाईचा हा बडगा उगारताना रिझव्‍‌र्ह बँकेने, तिच्या ६ एप्रिल २०१८ ला जाहीर केलेल्या देयक पद्धती माहिती साठवणुकीच्या नियमांचे पालन न झाल्याचा ठपका ठेवला आहे.

मास्टरकार्ड आशिया पॅसिफिकवर रिझव्‍‌र्ह बँकेने कारवाई केल्याने कंपनीच्या विद्यमान कार्डधारकांच्या सेवेवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर या कारवाईची सूचना कंपनीशी संलग्न सर्व बँका तसेच बिगर बँकिंग यंत्रणांना करण्यात आल्याचेही बजावण्यात आले आहे.

देयक पद्धती माहिती साठवणुकीबाबत भारतातील घडामोडींची पूर्तता रिझव्‍‌र्ह बँकेकडे सहा महिन्यात करावी, असेही मास्टरकार्डला सांगण्यात आले आहे. कारवाई झालेली मास्टरकार्ड ही तिसरी आंतरराष्ट्रीय वित्त कंपनी आहे.