Adani AGM : …म्हणून शेअर बाजारात कंपनीला एका दिवसात ५४ हजार कोटींचा फटका बसला; गौतम अदानींचा खुलासा

एकत्रित उत्पन्न हे ३२,००० कोटी इतके असल्याचं सांगत कंपन्यांचा करोत्तर नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६६ टक्क्यांनी वाढल्याचं गौतम अदानी म्हणाले

Adani AGM Gautam Adani Blames Media
एका दिवसात तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचा फटका अदानीमधील गुंतवणूकदारांना बसलेला.

अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना १४ जून रोजी २५ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीचा सामना करावा लागला. त्यामुळे समूहाच्या बाजार भांडवलाला एका दिवसात तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचा फटका बसला. अदानी समूहातील काही कंपन्यांच्या समभागांची मालकी असलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) गोठविली असल्याचे वृत्त समभागांतील या मोठय़ा पडझडीस कारण ठरले. मात्र या सर्व गोंधळानंतर अदानी समूह शेअर बाजारामध्ये सावरला असता तरी कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी यासंदर्भातील पहिली प्रतिक्रिया अदानी समुहाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये दिली आहे.

म्यानमारच्या सैन्याशी असलेल्या संबंधाचे कारण पुढे करत नोर्वेस्थित निवृत्ती वेतन निधी वित्तसंस्था केएलपीने भारताच्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीतील गुंतवणूक काढून घेतल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अदानी समुहामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका होता. केएलपीने १०.५ लाख डॉलरची गुंतवणूक रद्द करत असल्याची घोषणा केली. अदानीचे म्यानमार सैन्याबरोबरचे व्यावसायिक संबंध केएलपीच्या व्यवसाय मार्गदर्शक तत्त्वाकरिता जोखमेचे असल्याचे समर्थन यासाठी करण्यात आले होते. तीन विदेशी कंपन्यांच्या अदानी समूहातील विविध कंपन्यांमधील गुंतवणुकीने गेल्याच आठवडय़ात भांडवली बाजारात समभाग मूल्यफटका अनुभवणाऱ्या अदानी समूहापुढे यामुळे नवे संकट उभे राहिले होते. याचसंदर्भात बोलताना गौतम अदानींनी कंपनी गुंतवणुकीकडे कशापद्धतीने बघते हे सांगितलं.

नक्की वाचा >> Adani AGM : गौतम अदानी म्हणतात, “आम्ही पीएम केअर्स फंडमध्ये योगदान दिले असले तरी…”

“आमचा गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पिढ्यांच्या पलीकडे जातो. आम्ही आमच्या गुंतवणुकीतून आमचे भागीदार, अल्पसंख्यांक गुंतवणूकदार आणि कंपनीसाठी दीर्घकालीन शाश्वत मूल्य तयार करण्यावर विश्वास ठेवतो. मात्र काही मध्यमसमूहांनी बाजार नियमकाच्या काही प्रशासकीय कार्यवाहीबाबतच्या  बेजबाबदार आणि बेदरकार वृत्तांकन केल्याने अदानी समूहांच्या समभागात तीव्र चढ-उतार दिसून आले.  या घडामोडींचा काही छोट्या गुंतवणूकदारांवर विपरीत परिणाम झाला,” असं गौतम अदानी म्हणाले. “मात्र अशा घटना आमचे लक्ष विचलित करू शकणार नाहीत आणि एक कंपनी म्हणून आमच्यात हा कायमच आत्मविश्वास राहिला आहे कि आम्ही अशा आव्हानांचा सामना करू शकतो कि ज्याची इतर कल्पना पण करू शकत नाहीत. आमच्यासमोरचे प्रत्येक आव्हान आम्हाला अधिक मजबूत आणि अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करते,” असंही गौतम अदानी म्हणाले आहेत.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

२०२१ या आर्थिक वर्षासाठी सूचिबद्ध कंपन्यांचे व्याज, कर, घसारा आणि परिशोधन (अमोर्टिझशन) एकत्रित उत्पन्न हे ३२,००० कोटी इतके होते, मागील आर्थिक वर्षापेक्षा २२% वाढ या कंपन्यांनी उत्पन्नात नोंदवली. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या समभागांनी १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला. जवळपास ९ हजार ५०० कोटी रुपयाचा परतावा समभागधारकांना देण्यात आला. कंपन्यांचा करोत्तर नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६६ टक्क्यांनी वाढल्याचं गौतम अदानी म्हणाले.

सध्या अदानी समूह बंदर, विमानतळ, लॉजिस्टिक, नैसर्गिक संसाधने, औष्णिक आणि अपारंपरिक वीज उत्पादन, पारेषण, वितरण, डेटा सेंटर, संरक्षण, बांधकाम, शहरी वायू वितरण आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.  यातील प्रत्येक क्षेत्र हे जलद गतीने वाढत आहे, याशिवाय या प्रत्येक क्षेत्राचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे. तसेच भविष्यात आपण ज्या क्षेत्रात प्रवेश करणार आहोत त्यांचा हि या क्षेत्रांशी निकटचा संबंध असणार आहे, असं गौतम अदानींनी कंपनीच्या गुंतवणूकदारांना सांगितलं.

नक्की वाचा >> “…अदानींसोबत हवेत उडणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत”; मोदींचा फोटो शेअर करत नेत्याची टीका

शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव कोसळले होते. अदानी ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी गुंतवणुकदारांची खाती एनएनडीएलने गोठवली. या तिन्ही गुंतवणूकदारांनी अदानी समुहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जवळपास ४३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांची खाती सील केल्यानं याचा थेट परिणाम अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या समभागांवर (शेअर्स) झाला होता. एनएसडीएलने केलेल्या कारवाईचे वृत्त समोर येताच शेअर बाजारात याचे पडसाद उमटले. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले. अदानी इंटरप्राईजेसचे शेअर १५ टक्क्यांनी घसरून १,३६१.२५ रुपयांवर आले. तर अदानी पोर्ट अॅण्ड इकॉनॉमिक झोन या कंपनीचे शेअर्सचे भाव १४ टक्क्यांनी खाली आले होते. या पडझडीमुळे तीन दिवसांत गौतम अदानींची एकूण संपत्ती ९.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ७० हजार कोटी रुपयांनी कमी झाल्याचं पहायला मिळालं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Adani agm gautam adani blames irresponsible media reporting for fall in adani share price scsg