नवी दिल्ली : अदानी समूहातील तीन कंपन्यांनी मंगळवारी ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीमधील २९.१८ टक्के भागभांडवलाच्या अप्रत्यक्ष अधिग्रहणानंतर आता आणखी २६ टक्के हिस्सेदारी थेट विकत घेण्यासाठी तिच्या विद्यमान भागधारकांपुढे खुला प्रस्ताव ठेवला आहे.

एएमजी मीडिया नेटवर्क्‍स आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडसह विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी एनडीटीव्हीचे प्रत्येकी ४ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १.६७ कोटी भागभांडवली समभागांच्या अधिग्रहणासाठी प्रति समभाग २९४ रुपयांची किंमत देऊ केली आहे. एनडीटीव्हीच्या विद्यमान भागधारकांना उद्देशून आलेल्या या खुल्या प्रस्तावाची जेएम फायनान्शियल लिमिटेडद्वारे घोषणा झाली. अधिग्रहणकर्त्यांच्या वतीने या समभाग खरेदीचे व्यवस्थापन जेएम फायनान्शियलकडून पाहिले जात आहे.

समभागात ३८ टक्के वाढ

अदानी समूहाकडून अधिग्रहण केले जाण्याच्या चर्चेमुळे एनडीटीव्हीच्या समभागाचे मूल्य गत महिनाभरात २५२.५० (२७ जुलै) पातळीवरून तब्बल ३८ टक्क्यांनी वाढले आहे. मंगळवारच्या व्यवहारातही बीएसईवर समभाग २.६१ टक्के वाढून ३६६.२० रुपयांवर स्थिरावला.