पीटीआय, नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाला सावरण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन खर्ची पडत आहे. या पार्श्वभूमीवर देशाकडील परकीय चलन गंगाजळी संपुष्टात येण्याबाबत व्यक्त केल्या जाणाऱ्या शंका-कुशंकांना फेटाळून लावत सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी देशाकडे पुरेसे राखीव चलन आहे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय अर्थमंत्रालयातील वित्तीय व्यवहार सचिव अजय सेठ यांनी मंगळवारी केली. 

परकीय चलनाचा साठा सलग सातव्या आठवडय़ात घसरला असून, १६ सप्टेंबरला संपलेल्या पंधरवडय़ात तो ५४५.६५ अब्ज डॉलपर्यंत खाली आला आहे. जागतिक घडामोडींमुळे मुख्यत्वेकरून डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयाला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेने डॉलर खर्च केल्यामुळे मागील आठवडय़ात गंगाजळी २.२३ अब्ज डॉलरने कमी होत ५५०.८७ डॉलर झाली होती. देशाच्या आयात-निर्यातीमधील वाढत्या दरीमुळे व्यापार तूट रुंदावली आहे आणि देशांतर्गत येणारा परकीय निधीचा ओघही आटला आहे. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेला यातून धोका नसून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी देशाकडे पुरेसा परकीय चलन साठा आहे, असे सेठ यांनी सांगितले.

सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८१.६७ ही ऐतिहासिक विक्रमी नीचांकी पातळी गाठल्यानंतर, रुपया मंगळवारी पुन्हा सावरला. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत चलनात मोठी घसरण झालेली नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले होते.

 अमेरिकी डॉलरच्या तुलनेत इतर देशांच्या चलनांच्या घसरणीचा दर अधिक आहे. त्या तुलनेत भारतीय रुपयातील घसरण कमी आहे. चालू आर्थिक वर्षांत डॉलरच्या तुलनेत रुपया ९.५ टक्क्यांनी घसरला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने डॉलरच्या तुलनेत रुपयातील अस्थिरता आणि तीव्र चढ-उतार रोखण्यासाठी ७५ अब्ज डॉलर खर्ची केले आहेत. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाची पातळी निश्चित केलेली नाही, असेही त्या म्हणाल्या. गेल्या वर्षी ३ सप्टेंबर २०२१ला देशाची परकीय गंगाजळी ६४२.४५३ अब्ज या विक्रमी पातळीवर पोहोचली होती.

रुपया किंचित सावरला

सोमवारच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८१.५८ ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठल्यानंतर मंगळवारच्या सत्रात रुपया किंचित सावरला. मंगळवारी रुपया १४ पैशांनी सावरून ८१.५३ पातळीवर स्थिरावला. परकी चलन विनिमय मंचावर रुपयाने ८१.४५ पातळीवर व्यवहाराला सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात त्याने ८१.३० रुपयांची उच्चांकी तर ८१.६४ रुपयांचा तळ पहिला. सलग चार सत्रांतील घसरणीनंतर रुपया सावरला. मात्र, आधीच्या चार सत्रांत रुपयामध्ये १९३ पैशांची घसरण झाली आहे.