अग्रिम कर संकलनात वार्षिक तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढ

आघाडीच्या २० कंपन्यांनी त्यांच्या नफ्यावर देय असलेल्या अग्रिम करापोटी २७,२१० कोटींचा भरणा केला आहे.

आघाडीच्या कंपन्यांकडून २७,२१० कोटींचा भरणा

मुंबई : करोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्याच्या विकास वाढीच्या सूर्योदयात होत आहे. अनेक बँका, देशातील आघाडीच्या २० कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत केलेला अग्रिम कराचा भरणा गेल्या वर्षांच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी वधारला आहे.

आघाडीच्या २० कंपन्यांनी त्यांच्या नफ्यावर देय असलेल्या अग्रिम करापोटी २७,२१० कोटींचा भरणा केला आहे. १५ सप्टेंबर २०२१ अखेर दुसरा हप्ता म्हणून जमा झालेला हा कर गेल्यावर्षीच्या याच हप्त्याच्या तुलनेत त्यात ४७ टक्क्यांनी अधिक आहे. टाटा स्टील, ओएनजीसी आणि काही बँकांनी यावेळी अधिक अग्रिम कराचा भरणा केला. टाटा स्टीलने सर्वाधिक ४,००० कोटींचा अग्रिम कर भरणा केला आहे. जो गेल्यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत भरलेल्या कराच्या तब्बल ३,९०० टक्के अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वधारल्याचा सकारात्मक परिणाम ओएनजीसीवर झाला. ओएनजीसीने ६६२ टक्क्यांनी अधिक, २,२५० कोटी रुपयांचा अग्रिम कर भरला आहे. जो गेल्यावर्षी याच काळात फक्त २९५ कोटी रुपये होता.

दुसरीकडे, स्टेट बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांचे कर भरणा दुहेरी अंक गाठणारा आहे. स्टेट बँकेने ३,८३४ कोटी रुपये (गेल्या वर्षीच्या तुलनेत २८.८ टक्के जास्त) आणि एलआयसीने ३,१७१ कोटी रुपये (१२.८ टक्के जास्त) अग्रिम कर भरला आहे. त्यापाठोपाठ पंजाब नॅशनल बँकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत १२३ टक्के अधिक कर भरणा करत ३१३ कोटी रुपये, तर कॅनरा बँकेने ४१ टक्के अधिक कर भरत ८५० कोटी रुपयांचा भरणा केला आहे.

दुसऱ्या तिमाहीत करोनाची दुसरी लाट येऊनही ती कंपन्यांच्या आर्थिक वाढ आणि कमाईवर परिणाम करू शकली नाही. मात्र टाळेबंदीमुळे वाहतुकीवर बंधने असल्याने विमान आणि दूरसंचार क्षेत्रावर मात्र दबाव दिसून आला. ज्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही तिमाहीत कोणताही अग्रिम कर भरलेला नाही.

वाहन निर्मात्या कंपन्या आणि ग्राहकोपयोगी उत्पादनातील कंपन्यांना टाळेबंदीत शिथिलतेचा फायदा झाला. हीरो मोटोकॉर्पने ४१ टक्के अधिक अग्रिम कर भरला आणि मारुती सुझुकीने १३ टक्के अधिक कर दिला आहे. दोन्ही कंपन्यांनी यंदा अनुक्रमे २५० कोटी रुपये आणि ३४० कोटी रुपयांचा अग्रिम कर भरला आहे.

ग्राहकोपयोगी उत्पादनांतील हिंदुस्तान युनिलिव्हर, प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि नेस्ले यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक कर भरला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरने ८२२ कोटी रुपये (गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.६ टक्के अधिक), प्रॉक्टर अँड गॅम्बल ६२ कोटी (६७.५ टक्के अधिक) आणि नेस्लेने १८० कोटी रुपये (२.९ टक्क्यांनी अधिक) कर भरणा केला.

यांनी कर भरणा टाळला..

खासगी क्षेत्रातील आघाडीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, एचडीएफसी आणि आयटीसीसारख्या दिग्गज कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षांच्या दोन्ही तिमाहीत अग्रिम कर भरलेला नाही. कंपन्यांना त्यांचा तोटा (कॅरी फॉरवर्ड) पुढे नेण्याची परवानगी देणाऱ्या कायद्याने प्राप्त तरतुदीचा फायदा घेतला आहे, अशी माहिती कर अधिकाऱ्यांनी दिली. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार कंपन्या सहा वर्षांसाठी या तरतुदीचा फायदा घेऊ  शकतात. करोना संकटाचा विपरित परिमाम झेलणाऱ्या विमान कंपन्या आणि आर्थिक डबघाईला आलेल्या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही तिमाहीत कोणताही अग्रिम कर भरलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Advance tax collection increased by 47 percent compared to last year zws

ताज्या बातम्या