आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. क्रिप्टो करन्सी बाजारात देखील विक्रमी पडझड होऊन निर्देशांकाने नीचांकी पातळी गाठली आहे. CoinMarketCapच्या आकडेवारीनुसार, जगभरात क्रिप्टो बाजार मूल्य ९८५.०७ बिलियन डॉलर इतकं आहे. यामध्ये एका दिवसांत तब्बल ११.०८ टक्क्यांची घसरण झाली आहे. आजच्या पडझडीमुळे जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं आहे.

क्रिप्टो बाजारात मंदी असताना देखील बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी मानली जाते. पण गेल्या चोवीस तासांत बिटकॉइनमध्ये ११.१० टक्क्यांची घसरण झाली असून बिटकॉइनची किंमत २४,५५६.६५ अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांतील बिटकॉइनचं ट्रेडिंग मूल्य ५१,७०,२८,३१,२५८ अमेरिकन डॉलर इतकं आहे. बिटकॉइनसोबत ग्रीन सातोशी टोकन आणि BNB या क्रिप्टो करन्सीत देखील मोठी घसरण पाहायला मिळाली.

बिटकॉइनच्या झालेल्या पडझडीबाबत बोलताना WazirX ट्रेड डेस्कनं सांगितलं की, “गेल्या चोवीस तासांत बिटकॉइनच्या किमतीत १० टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे. त्यामुळे बिटकॉइनची किंमत २५ हजार डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या ५ महिन्यांतील ही सर्वात नीच्चांकी किंमत आहे. विशेष म्हणजे, डॉलर निर्देशांक (DXY) हा सहा महिन्यांच्या उच्चांकावर आहे, आज डॉलरची किंमत २ टक्क्यांनी वाढल्याने भांडवली बाजार आणि क्रिप्टो बाजारात घसरण झाली. बिटकॉइनने ओव्हरसोल्ड झोनमध्ये प्रवेश केल्यामुळे RSI इंडिकेटर देखील ३० च्या खाली आला.”

Mudrex-A ग्लोबल क्रिप्टो इन्व्हेस्टिंग प्लॅटफॉर्मचे सह-संस्थापक आणि सीईओ एडुल पटेल म्हणाले की, “अमेरिकेचा चलनवाढीबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर क्रिप्टो करन्सीच्या किमती घसरल्या आहेत. ही चलनवाढ गेल्या ४० वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. त्यामुळे भांडवली आणि क्रिप्टो बाजारातील गुंतवणुकदार घाबरले असून त्यांनी बाजारातील आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली. बाजारातील ही अस्थिरता कायम राहिल्यास, बिटकॉइनची किंमत आणखी खाली जाऊ शकते,” असंही ते म्हणाले.