पीटीआय, नवी दिल्ली : लवकर आलेला उन्हाळा आणि मार्चपासून जाणवू लागली भयंकर काहिली ही अनेकांसाठी असह्य ठरली असली तरी वातानुकूलकांच्या निर्मात्यांना मात्र ती सुखावणारी ठरली आहे. यंदाच्या हंगामातील विक्रीचा जोर पाहता, या वर्षी विक्रमी ९० लाख वातानुकूलकांच्या विक्रीची अपेक्षा या उद्योग क्षेत्राला निश्चितपणे करता येईल, असा विश्वास ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ने (सीईएएमए- सीमा) मंगळवारी व्यक्त केला.

चालू वर्षांत केवळ एप्रिल महिन्यात सुमारे १७.५ लाख वातानुकूलकांची विक्री झाली आहे, जो या महिन्यातील विक्रीचा सार्वकालिक उच्चांक आहे. एप्रिल २०२१च्या तुलनेत ही विक्री दुप्पट आहे आणि एप्रिल २०१९ मधील आकडेवारीपेक्षा ती ३०-३५ टक्के जास्त आहे, अशी ‘सीमा’चे अध्यक्ष एरिक ब्रॅगान्झा यांनी माहिती दिली. करोनापूर्व पातळीच्या तुलनेत यंदाची वाढ ‘विस्मयकारक’च आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

तथापि, काही उत्पादकांना त्यांच्या काही विशिष्ट श्रेणीच्या मॉडेल्सचा विशेषत: ऊर्जा-कार्यक्षम पंचतारांकित श्रेणीची उपकरणे ग्राहकांना उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरत आहे. उच्च मागणी पाहता तितक्या प्रमाणात पुरवठा करण्यातील ही समस्या आगामी काही महिन्यांतही कायम राहू शकते, असे ‘सीमा’चे अध्यक्ष एरिक ब्रॅगान्झा यांनी सांगितले. मुख्यत: कंट्रोलर्स आणि कॉम्प्रेसर या सारख्या सुटय़ा घटकांचा पुरवठा मर्यादित असल्याने तो वाढलेल्या मागणीला पुरेल इतका नसल्याची कबुली त्यांनी दिली.

४-५ टक्के किंमतवाढ शक्य

एकंदर बाजार प्रवाहानुसार मे आणि जूनमध्येदेखील देशात एसीची मागणी चांगली असते. पण यंदा बाजारपेठेतील वाढलेल्या एसीच्या मागणीला मार्चपासूनच सुरू झालेल्या उष्म्याच्या प्रखरतेला श्रेय दिले जाऊ शकते, असे ब्रॅगान्झा म्हणाले. यंदाचा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा आणि पहिल्या चार महिन्यांतील विक्रीच्या कलाच्या आधारावर, या वर्षी वातानुकूल यंत्रांची बाजारपेठ ही ८५ लाख ते ९० लाख उपकरणांच्या दरम्यान राहण्याची उद्योग क्षेत्राची अपेक्षा आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री असेल. तथापि, चीनमध्ये करोना,विक्री पाठोपाठ टाळेबंदीने पुन्हा डोके वर काढल्याने तेथून कंट्रोलर्स , कॉम्प्रेसर या महत्त्वाच्या घटकांच्या पुरवठय़ात अडचणी येऊ शकतात. अधिक ऊर्जा-कार्यक्षम एसीची मागणी पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होण्याचेही कयास आहेत. अपुरा पुरवठा, तसेच सुटय़ा घटकांच्या खर्चात लक्षणीय वाढ झाल्यामुळे, एसीच्या किमतीत चार ते पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते, असे ‘सीमा’ने सूचित केले आहे.