‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या अहवालाकडून कौतुकपर दखल

राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाचे भारतात झालेले खासगीकरण हा निश्चितच देशाच्या आर्थिक संरचनेतील संक्रमणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने सोमवारी केले.

टाटा समूहाने सर्वाधिक १८,००० कोटी रुपयांची बोली लावून सतत तोट्यात असलेल्या एअर इंडियाचा ताबा मिळविला असून, सरलेल्या ११ ऑक्टोबर केंद्र सरकारकडून टाटा समूहाला त्या संबंधाने इरादा पत्र सोपविलेही गेले आहे.

अलीकडेच पार पडलेली एअर इंडियाच्या विक्रीच्या यशस्वी प्रक्रिया स्वागतार्ह असून, तो नक्कीच एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशा शब्दांत आयएमएफ-एसटीआय प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक आणि माजी ‘आयएमएफ इंडिया मिशन’चे प्रमुख आल्फ्रेड शाइपके यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतासंबंधी तयार केलेल्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन शाइपके यांच्या हस्ते झाले. त्या समयी बोलताना ते म्हणाले, सर्वसाधारणपणे खासगीकरणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव मोलाचा ठरतो. यापुढे मध्यम मुदतीच्या खासगीकरणाच्या योजनांचे सुयश हे ठोस नियामक चौकट, स्पर्धात्मक बाजारपेठ आणि प्रमुख सहभागींकडून खरेदीतील स्वारस्य या घटकांकडून सुनिश्चित केले जाईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

संरचनात्मक सुधारणांच्या या संक्रमणांच्या दरम्यान सामाजिक सुरक्षा जाळेही मजबूत करणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जेणेकरून खासगीकरणाचे जास्तीत जास्त फायदे मिळविले जातील आणि प्रतिकूल परिणाम हे किमानतम राखले जाणे तितकेच गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या धोरण धडाक्याचे कौतुक

देशाच्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरणाच्या दिशेने मागील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हाती घेतलेल्या आवश्यक सुधारणांची नाणेनिधीच्या वार्षिक अहवालात कौतुकपर नोंद घेण्यात आली आहे. अशा १३० पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण धोरणात्मक कृतींची यादीच अहवालात देण्यात आली आहे.