पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ प्रतिसादाला हाक देण्याचे विदेशी विमाननिर्मिती कंपनी एअरबसने निश्चित केले असून याअंतर्गत भारतात प्रवासी विमाने तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लष्कराकरिता हेलिकॉप्टरही येथेच तयार करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी येत्या पाच वर्षांत कंपनी ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
एअरबस ग्रुप इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशीष सराफ यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले की, येथील सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा विदेशी कंपन्यांना हातभारच मिळणार आहे. अनेक विदेशी कंपन्या येथील टाटा, महिंद्र अँड महिंद्र या उद्योग समूहाबरोबर भागीदारी करत या क्षेत्रात कार्यरत आहेत. आम्हीही त्या दिशेने संधी चाचपून पाहात असून येथे आम्हाला भविष्यात कार्य करण्यास वाव आहे.
आशीष सराफ यांच्या नेतृत्वाखाली एअरबस ही आंतरराष्ट्रीय विमाननिर्मिती कंपनी ‘मेक इन इंडिया’वर भर देत असल्याचे हेरून ‘मॅक्सेल’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. याच मोहिमेविषयी सराफ यांनी सांगितले की, एअरबस कंपनी भारतात प्रवासी विमाने तसेच हॅलिकॉप्टर तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या नियोजनाअंतर्गत येत्या आठ वर्षांत ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल व त्यामार्फत येथे १० हजार रोजगारनिर्मिती होईल, असेही ते म्हणाले. मात्र त्यासाठी करण्यात येणाऱ्या भागीदारीबाबत, त्याचप्रमाणे उत्पादन प्रकल्पाच्या स्थळाबाबतही सराफ यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. विमाने तयार करणारा उद्योग हा वार्षिक २० टक्के वृद्धीदराने वाढ आला असून आगामी २०२५ पर्यंत ३,०००हून अधिक विमानांची गरज एकूण या बाजारपेठेला लागणार आहे, असेही सराफ म्हणाले.