scorecardresearch

विमान इंधनदर १८ टक्के वाढीने विक्रमी पातळीवर; पहिल्यांदाच किलोलिटरमागे एक लाख रुपयांपुढे मजल

एटीएफ दराने पहिल्यांदाच एक लाख रुपयांची पातळी ओलांडली असून ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.

विमानाच्या इंधनाच्या दरात बुधवारी पुन्हा १८ टक्क्यांची वाढ केली गेल्याने विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाल्यामुळे इंधन दरात गेल्या दोन महिन्यांपासून सतत वाढ सुरू आहे. सुमारे दोन वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या विमान कंपन्यांवरील आर्थिक ताण त्यामुळे आणखी वाढणार आहे.

एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे (एटीएफ) दर किलोलिटरमागे १७,१३५.६३ रुपयांनी म्हणजेच १८.३ टक्क्यांनी वाढल्याने, दिल्लीत त्याची किंमत आता किलोलिटरला १,१०,६६६.२९ रुपये झाली असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी दरांबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

एटीएफ दराने पहिल्यांदाच एक लाख रुपयांची पातळी ओलांडली असून ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. तर मुंबईमध्ये एटीएफचे दर किलोलिटरला १,०९,११९.८३ रुपयांवर पोहोचले आहे.

मागील पंधरवडय़ातील भारतात आयात होणाऱ्या खनिज तेलासाठी मानदंड असलेल्या ब्रेंट क्रूडच्या सरासरी आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारावर प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला जेट इंधनाच्या किमतीचा आढावा घेतला जातो.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर गेल्या काही दिवसांत १४० डॉलर प्रति पिंपापर्यंत पोहोचले होते. 

विमान कंपनीच्या चालू खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो. ऑगस्ट २००८ मध्ये सर्वप्रथम एटीएफचे दर ७१,०२८.२६ रुपये प्रति किलोलिटर अशा सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते, त्या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दराने प्रतिपिंप १४७ डॉलरचा दर गाठला होता.

दोन महिन्यांत ५० टक्के वाढ

विमानाच्या इंधनाच्या दरांमध्ये सलग सहाव्यांदा वाढ झाली आहे. नवीन वर्षांत म्हणजेच २०२२ च्या सुरुवातीपासून दर पंधरवडय़ाला एटीएफच्या किमती वाढल्या आहेत. मागील दोन महिन्यांच्या कालावधीत एटीएफचे दर किलोलिटरमागे ३६,६४३.८८ म्हणजेच ५० टक्क्यांनी वधारल्या आहेत. मात्र खनिज तेलाचे उत्पादन आणि पुरवठा वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव कमी झाले आहेत. त्यामुळे तूर्त पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ टळली आहे. आंतराष्ट्रीय दरात उलथापालथ सुरू असताना पेट्रोल-डिझेलच्या देशातील विक्री किमती सलग १३२ व्या दिवशी आहे त्या स्तरावर कायम राहिल्या आहेत. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये प्रति लिटरने कपात केली आणि तेव्हापासून इंधनाच्या किमतीत वाढ झालेली नाही.

एटीएफला जीएसटीच्या कक्षेत आणावे – इंडिगो

विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चामध्ये ४५ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च हा ‘एटीएफ’ इंधनावर होत असल्याने, त्यातील जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक वाढ ही कंपनीच्.या एकूण खर्चात मोठीच भर ठरते. एटीएफला वस्तू व सेवा कर – जीएसटीच्या कक्षेअंतर्गत आणण्यासाठी आम्ही सरकारशी चर्चा करत आहोत कारण यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा मिळून वाढीव खर्चाची भरपाई विमान कंपन्यांना करता येईल आणि ग्राहकांना विमानप्रवास परवडणाऱ्या दरात राखता येईल, अशी या दरवाढीवर प्रतिक्रिया इंडिगो या विमानसेवेचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी दिली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aircraft fuel prices rise by 18 per cent to record levels akp

ताज्या बातम्या