मुंबई : आर्थिक ओढग्रस्ततेतून गेली अडीच वर्षे विमान सेवा बंद असलेल्या जेट एअरवेजची देशांतर्गत उड्डाणे नववर्षारंभापासून पुन्हा होत आहेत. पुनर्रचित कंपनीची पहिली विमान फेरी दिल्ली-मुंबईदरम्यान सुरू होईल, असे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाच्या  दुबईस्थित उद्योगपती मुरारीलाल जालान आणि कालरॉक या गुंतवणूकदार संघाच्या संयुक्त योजनेला  ‘राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी)’ने जूनमध्ये मंजुरी दिली. तेव्हापासून विमान सेवेच्या परिचालनासाठी अस्तित्वात असलेले एअर ऑपरेटर प्रमाणपत्राच्या (एओसी) पुन:वैधतेची प्रक्रियाही कंपनीने सुरू केली होती.

१,००० कर्मचाऱ्यांची भरती प्रारंभिक तयारीसाठी जेटने सुमारे १५० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे आणि आर्थिक वर्षाच्याअखेरीस आणखी १००० कर्मचाऱ्यांची भरती के ली जाणे अपेक्षित आहे. हवाई सेवेच्या परिचालनाची गरज लक्षात घेऊन, नेमक्याच कर्मचाऱ्यांची टप्प्याटप्प्याने आणि काटेकोरपणे गुणवत्तेवर भरती केली जाईल, असे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सुधीर गौर म्हणाले. देशांतर्गत हवाई सेवेसाठी जागतिक स्तरावर अरुंद आकाराची विमाने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तथापि, आधीच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि देणी या संबंधाने कंपनीने काहीही भाष्य केलेले नाही. जेटचे मुख्यालय दिल्ली-एनसीआर येथे हलविले जाईल.