मुंबई : वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी विविध कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातींमधून धार्मिक भावना दुखावल्याच्या सर्वाधिक तक्रारी गेल्या तीन वर्षांत आल्याचे अ‍ॅडव्हर्टायिझग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाने (आस्की) केलेल्या अभ्यासातून गुरुवारी समोर आले. जाहिरातींमधून धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारींबरोबरच कोणत्याही धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रद्धा किंवा परंपरा यांची टर उडवणाऱ्या, तरुणांना आणि स्त्रियांना व्यक्तिसापेक्ष पद्धतीने दाखविणाऱ्या जाहिरातींविरोधात ‘त्या सांस्कृतिक तेढ निर्माण करणाऱ्या’ अशा तक्रारी देखील मोठय़ा प्रमाणावर नोंद झाली आहे, असे आस्कीने राबविलेल्या ‘व्हॉट इंडिया टेक्स ऑफेन्स टू’ या अभ्यासात आढळून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशात बहुसंख्याकांच्या वाढती आक्रमकता हा चिंतेचा विषय असून एखाद्या जाहिरातीवरून वाद निर्माण करून, जाहिरातकर्त्यां बडय़ा उद्योगांवर जाहिरातीचा आशय बदलण्यास अथवा जाहिरातच मागे घ्यावयास लावण्यासाठी दबावाचे प्रकार वाढले आहेत. उदारमतवादी लोकशाहीमध्ये कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणे हा गुन्हा आहे आणि तसा प्रयत्न जाहिरातीच्या माध्यमातून होणे गैरच आहे. तथापि जाहिरातींमध्ये जाणतेपणी धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तक्रारकर्त्यांना वाटत आहे. 

जाहिरातींमध्ये एखाद्या परंपरेचा नवीन अर्थ लावणे, वेगवगेळय़ा धर्माच्या कथनांचे एकत्रित स्वरूपात चित्रण आणि व्यंग- उपहासात्मक जाहिरातपटांमध्ये धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रतीकांचा टवाळकीसाठी वापर केला जात असण्याच्या संदर्भातील तक्रारी येत असल्याचेही आस्कीने म्हटले आहे. तीन वर्षांत प्राप्त झालेल्या १,७०० तक्रारींवरून आस्कीने हा अहवाल तयार केला आहे. ‘मोहे मान्यवर’ने ‘कन्यादान’ या लग्नाच्या विधीला जाचक प्रथा म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न केला असून त्यात धर्माची थट्टा असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे, तर आयसीआयसीआय बँकेच्या जाहिरातीत ‘उपर वाला’ या वाक्याचा वापर करून इस्लामचा प्रचार केला जात असल्याचे तक्रारकर्त्यांने म्हटले आहे, अशा काही धार्मिक भावना दुखावल्या जाणाऱ्या विविध जाहिरातींची उदाहरणे अहलवात नमूद करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegations hurting religious sentiments advertisements ysh
First published on: 19-01-2022 at 02:28 IST