मुंबई : अमेरिकी डॉलर पुढे रुपयाने बुधवारच्या सत्रात १८ पैशांची गटांगळी घेत ७९.०३ रुपयांची ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. जागतिक पातळीवर इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत प्रबळ होणारा डॉलर, देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरण आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमती याच्या एकंदर परिणामी रुपयाने डॉलरपुढे नांगी टाकली.

रुपयाने गेले काही दिवस सलगपणे नवनवीन नीचांकपद गाठत चालला आहे. बुधवारी आंतरबँक चलन व्यवहारात, रुपयाने ७८.८६ या नीचांकापासूनच व्यवहारास सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात रुपयातील घसरण अधिक वाढल्याने रुपयाने ७९ रुपयांची पातळी मोडत ७९.०३ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. मंगळवारच्या सत्रात देखील डॉलरच्या तुलनेत रुपयाने एका सत्रात थेट ४६ पैशांचे मूल्य गमावत ७८.८३ पातळी गाठली होती. रुपयाच्या घसरणीची वाढलेली तीव्रता पाहता, त्याने प्रति डॉलर ८० ची वेस ओलांडण्याचे अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केलेले भाकित प्रत्यक्षात फार दूर नसल्याचे बोलले जात आहे. 

जागतिक पातळीवर जोखीम टाळण्यासाठी वाढती मागणी आणि कमी झालेल्या तरलतेमुळे डॉलरला अधिक बळ मिळाले आहे आणि त्या परिणामी रुपयात घसरण कायम आहे. तसेच आगामी काळात फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर वाढ अधिक तीव्र केली जाणार आहे. यामुळे परदेशी निधीचे माघारी जाणे अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने डॉलरचा निर्गमन वाढल्याने रुपया अधिक कमजोर बनेल.

२०२२ मध्ये ६.३९ टक्के घसरण

चालू महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयात १.९७ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर २०२२ सालात जानेवारीपासून रुपयाने ६.३९ टक्के मूल्य गमावले आहे.