scorecardresearch

चित्रपटगृह व्यवसायातून अनिल अंबानी बाहेर

कर्जभार कमी करण्यासाठी मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करत गेल्या काही महिन्यांपासून अन्य उपक्रम विकण्याच्या प्रक्रियेत असलेल्या अनिल अंबानी यांनी आपल्या अखत्यारितील चित्रपटगृह व्यवसाय अखेर विकला आहे.

चित्रपटगृह व्यवसायातून अनिल अंबानी बाहेर

कर्जभार कमी करण्यासाठी मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करत गेल्या काही महिन्यांपासून अन्य उपक्रम विकण्याच्या प्रक्रियेत असलेल्या अनिल अंबानी यांनी आपल्या अखत्यारितील चित्रपटगृह व्यवसाय अखेर विकला आहे. देशभरात २५० हून अधिक पडद्यांची नाममुद्रा असलेला ‘बिग सिनेमाज’ हा व्यवसाय दक्षिण भारतातील ‘कार्निवल’ला विकून ७०० कोटी रुपये उभारले आहेत. भारतीय चित्रपटगृह क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे.
रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स मीडियावर्क्‍सचे बिग सिनेमाज नावाने कंपनीचे देशभरात २५८ पडदे आहेत. कंपनीने काही वर्षांपूर्वी अ‍ॅडलॅब्स खरेदी करत या नाममुद्रेखालील चित्रपटगृहांचे बिग सिनेमाज असे नामांतर केले होते. या व्यतिरिक्त कंपनीचे आयमॅक्स हे मुंबईतील वडाळास्थित चित्रपटगृह तसेच काही स्थावर मालमत्ता या २०० कोटी रुपयांच्या आहेत. यांचा या विक्री व्यवहारात समावेश करण्यात आलेला नाही.
बिग सिनेमाजच्या व्यवहारामुळे कार्निवल समूह देशातील तिसरी मोठी चित्रपटगृह साखळी चालविणारा बनला असून तिच्या एकूण पडद्यांची संख्या आता ३०० हून अधिक झाली आहे. भारतात सध्या चित्रपटगृह दालनांमध्ये पीव्हीआर व आयनॉक्स हे अनुक्रमे पहिल्या (४५४) व दुसऱ्या (३६१) क्रमांकावर आहेत. कार्निवल समूहाचे अध्यक्ष श्रीकांत भसी यांनी पडद्यांची संख्या येत्या २०१७ पर्यंत १,००० वर नेण्याचा मानस यानिमित्ताने व्यक्त केला आहे. तर रिलायन्स कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम घोष यांनी कंपनी आता मुख्य वित्तीय सेवा व्यवसायावरच लक्ष केंद्रित करेल, असे स्पष्ट केले आहे. कार्निवल ही कोचीस्थित मुख्यत: वायदा वस्तू व्यवहारातील कंपनी आहे. बिग सिनेमाज खरेदीमुळे कार्निवलचे अस्तित्व आता महानगरे तसेच मोठय़ा शहरांमध्येही निर्माण होईल.
रिलायन्स समूह गेल्या काही महिन्यांपासून अन्य व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने जागतिक चित्रपट आणि माध्यम सेवा व्यवसाय थांबविला होता. याद्वारे तिची आंतरराष्ट्रीय कंपनी प्राइम फोकसमध्ये विलीन केली. रिलायन्स मीडियावर्क्‍स व प्राइम फोकस यांनी यासाठी प्रत्येकी १२० कोटी रुपयांचे भाग भांडवल ओतले होते. भारताव्यतिरिक्त समूहाचा अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, चीन, सिंगापूर येथेही माध्यम व्यवसाय आहे. रिलायन्स कॅपिटल तिचा प्रवास व पर्यटन संकेतस्थळ यात्रा.कॉममधील १६ टक्के हिस्सा विकण्याच्या चर्चेत सध्या व्यस्त आहे. या माध्यमातून कंपनीला ५०० कोटी रुपये मिळण्याची आशा आहे.
मल्टिप्लेक्स व्यवहार वाढले
चित्रपटगृह क्षेत्रातील खरेदी-विक्री व्यवहार गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा वाढले आहेत. मेक्सिन चित्रपटगृह दालन साखळी चालविणाऱ्या सिनेपॉलिसने काही महिन्यांपूर्वीच फन सिनेमाज खरेदी केली होती. झी दूरचित्रवाहिन्या चालविणाऱ्या एस्सेल समूहाचे ८३ फन सिनेमाज पडदे ४८० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. यामुळे सिनेपॉलिसच्या पडद्यांची संख्या १९३ झाली. तर आयनॉक्सने दिल्लीस्थित सत्यम सिनेप्लेक्स २४० कोटी रुपयांना खरेदी केली होती.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2014 at 12:23 IST

संबंधित बातम्या