नवीन उद्योगांना संधी मिळत नसल्याचा अनिल अंबानी यांचा सूर संरक्षण क्षेत्रात नवीन उद्योगांना अनुभव नसल्याच्या सबबीखाली संधी नाकारली जाते व काही हितसंबंधी लोक स्पर्धा होऊ नये यासाठी सापळे रचतात, अशी टीका उद्योगपती अनिल अंबानी यांनी केली आहे. रिलायन्स समूहाचे प्रमुख असलेले अनिल अंबानी आता संरक्षण उद्योगातही उतरले आहेत. ते म्हणाले, की सरकारने धोरणात्मक भागीदारीचे धोरण आखले आहे पण त्यात अधिक स्पष्टता आणतानाच जागतिक मान्यताप्राप्त पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. खुले धोरण वापरले तर स्पर्धात्मकता वाढणार आहे. अंबानी यांनी संरक्षण प्रदर्शनानिमित्त आयोजित चर्चासत्रात सांगितले, की केंद्रात सुधारणावादी सरकार असतानाही नवीन उद्योजकांना अनुभव नसल्याच्या सबबीखाली संधी नाकारली जात आहे. स्पर्धात्मकता टाळण्यासाठी संरक्षण उद्योगात सापळे लावले जात आहेत. अंबानी यांनी परदेशी उद्योगांबरोबर काही संरक्षण उद्योग भागीदाऱ्यांची घोषणा केली पण अजून त्यांना प्रत्यक्षात कंत्राटे मिळालेली नाहीत. ते म्हणाले, की माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व स्वयंचलित वाहनांच्या उद्योगातही अशा प्रकारे अनुभव असलेल्यांनाच प्राधान्य दिले गेले असते तर आजच्या इतकी प्रगती दिसली नसती. संरक्षण उद्योगात आजही आधीचा अनुभव विचारात घेतला जात आहे, त्यावर विसंबूनच कामे दिली जातात, हा दृष्टिकोन बदलला पाहिजे व खासगी क्षेत्राला राष्ट्रीय सुरक्षेत महत्त्वाची भूमिका पार पाडू देणे ही काळाची गरज आहे. अनुभवाचे महत्त्व कुणी नाकारत नाही पण यशस्वी उद्योगात अनेक घटक महत्त्वाचे असतात, त्यात क्षमता, स्पर्धात्मकता, वचनबद्धता, दृष्टी, जोखीम क्षमता यांचा समावेश आहे. माझे वडील धीरूभाई अंबानी हे रासायनिक अभियंता नव्हते व तंत्रज्ञही नव्हते. त्यांना तेल व वायू क्षेत्रातील आधीचा काही अनुभव नव्हता, तरी त्यांनी जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प, पेट्रोरसायन संकुल उभारले. अनुभव हीच जर उद्योगातील यशाची मोजपट्टी ठरवायची, तर रिलायन्स उद्योग आज दिसला नसता.