अनिल यांच्या दूरसंचार मालमत्तांची मुकेश यांच्याकडून खरेदी

गळ्यापर्यंत आलेल्या प्रचंड कर्जाच्या फासातून अनिल अंबानी यांना अखेर थोरल्या भावानेच तारले आहे. अनिल अंबानी यांच्याकडील दूरसंचार मनोरे तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय मुकेश अंबानी यांनी खरेदी केला आहे. मात्र हा व्यवहार किती रकमेत झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.

अनिल अंबानी यांच्याकडील रिलायन्स कम्युनिकेशन्स अंतर्गत असलेले ४३,००० दूरसंचार मनोरे, ४जी सेवा तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय रिलायन्स जिओने खरेदी करण्याबाबतचा करार गुरुवारी मुंबईत झाला. या माध्यमातून अनिल अंबानी यांनी या क्षेत्रातील त्यांच्याकडील अखेरच्या व्यवसायातूनही अंग काढून घेतले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सने मार्च २०१७ अखेर १,२८५ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडबरोबरचा नवा व्यवहार येत्या तिमाहीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. गोल्डमॅन सॅच, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स, जेएम फायनान्शिअल, डेव्हिस पोल्क अँड वार्डवेल, सिरिल अमरचंद मंगलदास, खैतान अँड कंपनी व अर्न्‍स्ट अँड यंग यांच्या मध्यस्थीने हा व्यवहार होत आहे.

सुरुवातीच्या कालावधीत इन्फोकॉम नावाने दूरसंचार व्यवसाय एकत्रित रिलायन्स समूहाकडे होता. मात्र २००० च्या दशकप्रारंभीच व्यवसायाकरिता विलग झालेल्या अंबानी बंधूंपैकी अनिल अंबानी यांच्याकडे दूरसंचार व्यवसाय आला होता. यानंतर २०१६ च्या अखेरीस मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओमार्फत या व्यवसायात पुनप्र्रवेश केला.

वर्षभरापूर्वीच्या रिलायन्स जिओच्या दूरसंचार व्यवसाय पदार्पणाने अन्य स्पर्धक दूरसंचार कंपन्यांबरोबरच रिलायन्स कम्युनिकेशन्सचा आर्थिक पाय आणखी खोलात गेला होता. २००० दशकाच्या सुरुवातीला स्वतंत्र व्यवसायाद्वारे विलग झालेले अंबानी बंधू भागीदारी तसेच सहकार्याच्या माध्यमातून अनेकदा एकत्र आले होते.

रिलायन्स जिओबरोबरच भारती एअरटेलही रिलायन्स कम्युनिकेशन्सचा हा व्यवसाय खरेदीकरिता उत्सुक होती. रिलायन्स कम्युनिकेशन्सची २जी सेवा नोव्हेंबरअखेरपासून बंद करण्यात आली आहे. कंपनीने तिचा डीटीएच व्यवसायही गेल्याच महिन्यात विकला.

रिलायन्स कम्युनिकेशन्सवरील ४४,००० कोटी रुपयांचा कर्जभार कमी करण्याबाबतचा नवा ठराव आराखडा अनिल अंबानी यांनी मंगळवारीच सादर केला होता. याद्वारे मार्च २०१८ पर्यंत कर्ज ५,००० कोटी रुपयांपर्यंत कमी होईल, असा दावा अनिल अंबानी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला होता.

कंपनीवर सध्या ४४,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. पैकी २४,००० कोटी रुपये कर्ज हे देशांतर्गत तर २०,००० कोटी रुपयांचे कर्ज हे विदेशातून घेतलेले आहे. थकीत कर्जापोटी चिनी बँकेनेही अंबानी यांच्या या कंपनीविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतली आहे. भारतातील अनेक सार्वजनिक बँकाही कर्जवसुलीकरिता कंपनीविरोधात पावले टाकण्यासाठी सरसावल्या आहेत.