उद्यमशील, उद्य‘मी’ : अग्रेषित अधीरता

इन्सायडर ट्रेडिंगचा कायदा १९९२ पासून अस्तित्वात आहे

संग्रहित छायाचित्र

मकरंद जोशी

श्रिया ही एका शेअर दलाल कंपनीत काम करणारी मुलगी (नाव बदलले आहे). जास्तीत जास्त ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या टिप्स देण्याचा प्रयत्न ती करत असे. एक वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या ६-८ सूचिबद्ध कंपन्यांबद्दल त्यांच्या नफा आणि उलाढालीबद्दलची गोपनीय माहिती तिच्या काही सूत्रांकडून तिला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळाली. श्रियान ती माहिती तिच्या मोबाइलमध्ये नंबर नोंद असलेल्या काही मित्र-मंडळींना आणि ग्राहकांना (फॉरवर्ड अर्थात अग्रेषित केली) कळवली. सेबीने (रएइक) श्रियावर रु. १५ लाख प्रति कंपनी या हिशोबाने रु. १ कोटीचा दंड ठोठावला!

तुम्ही मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता का?

पाठक (नाव बदलले आहे) हे एका औषध कंपनीमध्ये एका वरिष्ठ पदावरील शाह (नाव बदलले आहे) या व्यक्तीचे स्वीय साहाय्यक आहेत. एकदा शाह यांनी पाठक यांना सांगितले की, आपल्याला एक डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट पाठक यांच्या पत्नीच्या नावाने सुरू करायचे आहे आणि त्याबदल्यात पाठक यांना रु. १ लाख मिळू शकतात. पाठक पती-पत्नी आनंदाने तयार झाले. आज दोघेही आणि त्यांचे वरिष्ठ यांना रु. १ कोटीचा दंड सेबीतर्फे ठोठावला गेला आहे. शहा त्या औषध कंपनीमध्ये उच्च पदावर असल्यामुळे त्यांना कंपनीबद्दल काही गोपनीय माहिती होती. ती माहिती सगळ्यांना माहीत झाल्यावर कंपनीच्या समभागाचे मूल्य खूप वाढेल हे शहा यांना माहीत होते. त्यांनी त्यांचे पैसे पाठक यांच्या पत्नीच्या नावे फिरवून शेअर्समध्ये व्यवहार केले. सेबीने हे हेरून त्यांना दंड ठोठावला.

इन्सायडर ट्रेडिंग!

खरं तर हा विषय भांडवली बाजारात सूचिबद्ध (छ्र२३ी)ि असलेल्या कंपनीबद्दलचा आहे. पण सामान्य नागरिक कधी लोभापायी तर कधी कोणाला खूश करायला किंवा कधी अनवधानाने यामध्ये अडकू शकतात. मोठय़ा सूचिबद्ध कंपन्यांना (१) कुठलीही महत्त्वाची घटना घडली की नियमानुसार ती भांडवली बाजाराला कळवावी लागते. आणि (२) जोपर्यंत ती गोष्ट भांडवली बाजाराला कळवली जात नाही तोपर्यंत ती गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे. तसेच (३) या गोपनीय माहितीची उपलब्धता असणाऱ्या व्यक्ती दरम्यानच्या कालावधीत त्या कंपनीच्या समभागांचे खरेदी/विक्री व्यवहार करू शकत नाही असा दंडक आहे. पहिल्या घटनेमध्ये श्रियाने अशी गोपनीय माहिती दुसऱ्या लोकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवली. म्हणजेच तिने गोपनीयतेचा भंग केला म्हणून तिला दंड झाला. दुसऱ्या घटनेमध्ये पाठक दाम्पत्य आणि शाह यांनी गोपनीय माहिती असताना कंपनीच्या समभागांचे खरेदी-विक्री व्यवहार के ले व त्यांना दंड झाला.

इन्सायडर ट्रेडिंगचा कायदा १९९२ पासून अस्तित्वात आहे. पण त्याची परिणामकारक अंमलबजावणी गेल्या काही वर्षांमध्ये प्रकर्षांने दिसू लागली आहे. या नियमांचा भंग केल्यास कमीत कमी रु. १० लाख ते जास्तीत जास्त रु. २५ कोटी किंवा केलेल्या नफ्याच्या तीन पट इतका दंड होऊ शकतो. वर्ष २०१९-२० मध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यंची माहिती पुरवणाऱ्यांना सेबीने लावलेल्या दंडाच्या १०% रक्कम बक्षीस म्हणून देण्याबद्दलची योजनादेखील कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा घटना खूप जास्त प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे.

काय काळजी घ्यावी?

१) आपण सूचिबद्ध कंपनीमध्ये काम करत असाल किंवा त्याच्याशी संबंधित सल्लागार किंवा वितरक इत्यादी असाल तर त्या कंपनीच्या समभागामध्ये व्यवहार करण्याआधी कायदेशीर सल्ला घ्यावा. २) ही खबरदारी आपल्या घरातल्या आणि जवळच्या नातेवाईकांना सांगावी. ३) कुठलीही मिळालेली टीप कोणालाही पाठवू नका. तसेच त्या टीपच्या आधारे समभागांमध्ये व्यवहार करू नका. ४) अशा प्रकारच्या गोपनीय माहितीची चर्चा करणाऱ्या व्यक्ती, समूहापासून दूर राहा.

आजकाल शेअर्स ट्रेडिंगच्या ऑनलाइन कोचिंगचे पेव फुटले आहे. परंतु समभाग करताना इन्सायडर ट्रेडिंग कायद्याचे ज्ञान बाळगणेही तेवढेच आवश्यक आहे.

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

makarandjoshi@mmjc.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on insider trading abn

ताज्या बातम्या