देशातील सर्वात मोठय़ा बँकेच्या प्रमुखपदाची धुरा एका महिला अधिकाऱ्याकडे येण्याचा पथ दृष्टिक्षेपात दिसू लागला आहे. राष्ट्रीयीकृत भारतीय स्टेट बँकेच्या  व्यवस्थापकीय संचालक व मुख्य वित्तीय अधिकारीपदी अरुंधती भट्टाचार्य यांची नेमणूक करून स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी प्रथमच एका महिलेची नेमणूक होण्याचे संकेत अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँकेच्या
उपव्यवस्थापकीय संचालक व स्टेट बँकेची उपकंपनी व गुंतवणूक सल्लागार असलेल्या एसबीआय कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होत्या. स्टेट बँकेचे अध्यक्ष असलेले प्रतीप चौधरी धरून बँकेवर चार व्यस्थापकीय संचालक आहेत. पकी एकाची प्रतीप चौधरी यांच्या निवृत्तीनंतर स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी निवड होईल. अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर निवृत्तीस किमान दोन वष्रे शिल्लक असावी हा एक महत्त्वाचा निकष आहे. प्रतीप चौधरी हे येत्या सप्टेंबरअखेर सेवानिवृत्त होत आहेत. अर्थ मंत्रालय त्यांच्या वर्षांच्या मुदतवाढीसाठी आग्रही आहे तर निवडणूक वर्षांत बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्यांना महिला असावी यासाठी पंतप्रधान कार्यालय प्रतीप चौधरी यांच्या मुदतवाढीस विरोध करण्याची शक्यता आहे. १९९८ मध्ये रंजनाकुमारी यांच्या माध्यमातून (इंडियन बँक अध्यक्ष) राष्ट्रीयकृत बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा महिला विराजमान झाली. परंतू स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी या पूर्वी कोणत्याही महिलेची निवड झालेली नाही. दिवाकर गुप्ता यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिकाम्या झालेल्या व्यवस्थापकीय संचालकपदावर अरुंधती रुजू झाल्या आहेत.