अरविंद या नावाभोवती केंद्रातील मोदी सरकारने चांगलाच फेर धरला आहे. लांबणीवर टाकलेल्या देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदासाठी अखेर मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागले, तर काँग्रेसप्रणीत आघाडीबरोबरच नव्या आघाडी सरकारमध्ये रुळलेले केंद्रीय वित्त सचिव अरविंद मायाराम यांची  बदली पर्यटन या बिनमहत्त्वाच्या खात्यात करण्याचा गुरुवारी निर्णय घेण्यात आला. मायाराम यांच्याकडील सूत्रे आता राजस्थानचे मुख्य सचिव राहिलेल्या राजीव मेहरिषी यांच्याकडे देण्यात आली आहेत.
भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून येत्या तीन वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांना नेमण्यात आले आहे. भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत राहिलेल्या सुब्रमण्यम हे हॉर्वर्ड आणि हॉपकिन्स विद्यापीठात व्याख्याते म्हणूनही राहिले आहेत. जागतिक बँक तसेच जागतिक व्यापार संघटनेवरही त्यांनी महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. अमेरिकास्थित सुब्रमण्यम यांचे शिक्षण भारत तसेच ब्रिटनमध्ये झाले आहे.
अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे विद्यार्थी राहिलेल्या सुब्रमण्यम यांच्या नियुक्तीच्या रूपाने गेले वर्षभर रिक्त असलेले मुख्य आर्थिक सल्लागाराचे पद भरले गेले आहे. डॉ. राजन हे गेल्या सप्टेंबरमध्ये रिझव्र्ह बँकेत रुजू झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. हंगामी तसेच मध्यान्ह अर्थसंकल्पाच्या वेळी उणीव असणाऱ्या मुख्य आर्थिक सल्लागारामुळे आता मोदी सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच महिन्याभरापूर्वी सुब्रमण्यम यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र आजारपणाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर निर्णय घेण्याऐवजी मुख्य आर्थिक सल्लागार पदासाठी आणखी काही नावे सुचविण्यास वित्त खात्याला सांगितले होते. जेटली यांनी सादर केलेला मध्यान्ह अर्थसंकल्प तसेच नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार संघटनेबरोबरचा रद्द केलेल्या कराराबद्दल सुब्रमण्यम यांनी नापसंती व्यक्त केली होती.
माजी अर्थमंत्री प्रणब मुखर्जी, पी. चिदम्बरम यांच्याबरोबरच नवे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या  कारकिर्दीपर्यंत अर्थखात्यात वित्तीय सचिव राहिलेले मायाराम हे सर्व वित्त सचिवांमध्ये वरिष्ठ होते. वित्तबरोबरच अर्थ व्यवहार खात्याचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मायाराम यांच्या निवृत्तीस एक वर्ष शिल्लक असतानाच अचानक त्यांची बदली बिनमहत्त्वाच्या अशा पर्यटन विभागात करण्यात आली आहे. मायाराम यांच्याकडील कार्यभार हाती आलेल्या मेहरिषी हेदेखील येत्या ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत.
राजस्थानमधील भाजपच्या वसुंधरा राजे सरकारमध्ये मेहरिषी यांची नियुक्ती गेल्या डिसेंबरमध्ये मुख्य सचिव म्हणून झाली. केंद्रीय रसायन व खते विभागात सचिव म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने उपरोक्त नियुक्त्यांवर निर्णय घेताना मोदी सरकारने मायाराम यांच्या रूपात प्रथमच प्रशासन नियुक्ती पातळीवर मोठी उलथापालथ नोंदविली आहे.