मुंबई : आलिशान फरशी आणि लाद्यांच्या निर्मितीतील एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने विद्यमान भागधारकांना हक्कभाग (राइट्स शेअर्स) विकून ४४१ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.

कंपनीने नव्याने सामावून घेतलेल्या उपकंपन्यांतर्गत मोरबी, गुजरात येथे तीन नवीन अत्याधुनिक उत्पादन सुविधांद्वारे नव्या प्रकारच्या उत्पादन विभागामध्ये विस्ताराच्या योजना आखल्या आहेत, त्यासाठी हा निधी वापरात येणार आहे.

या हक्कभाग विक्रीअंतर्गत प्रत्येकी ६३ रुपये किमतीला विद्यमान भागधारकांना समभाग देण्यात येणार आहेत. म्हणजेच ६ एप्रिलच्या राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या समभागाच्या ११८ रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत ४६.६ टक्के सवलतीत नवीन समभाग भागधारकांना येत्या २५ एप्रिलपासून खरेदी करता येतील. या हक्कभाग विक्रीसाठी १२ एप्रिल ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली गेली आहे. म्हणजेच १२ एप्रिल अथवा त्या आधीपासून कंपनीचे भागधारक असणारे या  हक्कभाग विक्रीत सहभागासाठी पात्र ठरतील. ही विक्री १० मे २०२२ पर्यंत सुरू राहील. पात्र समभागधारकांना त्यांनी धारण केलेल्या प्रत्येक ३० समभागांसाठी ३७ समभागांसाठी या हक्कभाग विक्रीत अर्ज करता येईल. पेंटोमाथ कॅपिटल ही हक्कभाग विक्रीची प्रधान व्यवस्थापक आहे.