Auction assets by SEBI in Sharda Chit Fund case Scam of the auction ysh 95 | Loksatta

शारदा चिटफंडप्रकरणी ‘सेबी’कडून मालमत्तांचा लिलाव

कोलकाता उच्च न्यायालयाने जूनमध्ये दिलेल्या आदेशानुसार, ‘सेबी’ला शारदा समूहातील कंपन्यांच्या मालमत्तांचा लिलाव योजण्याचे निर्देश दिले आहेत.

शारदा चिटफंडप्रकरणी ‘सेबी’कडून मालमत्तांचा लिलाव
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

घोटाळा ४,००० कोटींचा, लिलावाचे मूल्य अवघे ५.२१ कोटी रुपये

पीटीआय, नवी दिल्ली : चिटफंडाद्वारे लक्षावधी ठेवीदारांकडून ४,००० कोटींहून अधिक निधी गोळा करणाऱ्या शारदा समूहातील कंपन्यांच्या तीन मालमत्तांच्या लिलावासाठी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने १६ डिसेंबर ही तारीख निश्चित केल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बेकायदेशीर योजनांद्वारे कंपनीने जनतेकडून गोळा केलेले पैसे वसूल करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘सेबी’ने या लिलावाचे आयोजन केले असले तरी, लिलावासाठी निश्चित केलेल्या मालमत्तांसाठी निर्धारित राखीव किंमत ही अवघी ५.२१ कोटी रुपये इतकी आहे. हा लिलाव १६ डिसेंबरला सकाळी ११ ते १२ या वेळेत केला जाणार आहे. या मालमत्तांमध्ये पश्चिम बंगालमधील जमिनींचा समावेश आहे. ऑनलाइन नोंदणी आणि ई-लिलाव प्रक्रिया क्विकर रिअ‍ॅल्टी या कंपनीद्वारे पार पाडली जाईल.

कोलकाता उच्च न्यायालयाने जूनमध्ये दिलेल्या आदेशानुसार, ‘सेबी’ला शारदा समूहातील कंपन्यांच्या मालमत्तांचा लिलाव योजण्याचे निर्देश दिले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. शारदा हे २३९ हून अधिक खासगी कंपन्यांचा समूह असून, त्याने पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये चिटफंड योजना चालविली होती. एप्रिल २०१३ मध्ये या फसव्या गुंतवणूक योजनेचा पर्दाफाश होईपर्यंत १७ लाख ठेवीदारांकडून ४,००० कोटी रुपये गोळा केले गेले होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2022 at 01:25 IST
Next Story
निर्देशांकांची माघार