मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने भारतातील सिटी बँकेच्या क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, कर्ज व्यवसाय आणि मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय १२,३२५ कोटी रुपयांच्या (१.६ अब्ज अमेरिकी डॉलर) मोबदल्यात खरेदी करीत असल्याची बुधवारी घोषणा केली.

अ‍ॅक्सिस बँक लवकरच सिटी बँकेच्या भारतातील विद्यमान ३० लाख किरकोळ ग्राहकांना सेवा देणार असून, यामुळे बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवसायात थेट ३१ टक्क्यांची वाढ साधली जाणार आहे. याचबरोबर अ‍ॅक्सिस बँकेकडून देशातील १८ शहरांमधील सात कार्यालये, २१ बँक शाखा आणि ४९९ एटीएम केंद्राचा अ‍ॅक्सिस बँकेच्या जाळय़ात समावेश होणार आहे. सिटी बँकेचे ३,६०० कर्मचारीदेखील अ‍ॅक्सिस बँकेत सामावून घेतले जातील. सिटी समूहाने १९०२ मध्ये भारतात प्रवेश केला आणि १९८५ मध्ये रिटेल बँकिंग व्यवसायाला सुरुवात केली होती.

विदेशी बँकांची पाठ

एएनझेड ग्रिंडलेज, आरबीएस, कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया यांसारख्या जागतिक बँकांनी भारतातील त्यांचे कामकाज बंद केले आहे. आता यामध्ये सिटी बँकेची भर पडली आहे. २०११ मध्ये, डॉइशे बँकेने आपला क्रेडिट कार्ड व्यवसाय इंडसइंड बँकेला विकला. तर २०१३ मध्ये, यूबीएसने भारतातील व्यवसाय गुंडाळला. मॉर्गन स्टॅन्लेनेही बँकिंग परवाना परत करत फक्त इन्व्हेस्टमेंट बँकिंग व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्याचप्रमाणे मेरिल िलच, बार्कलेज आणि स्टँडर्ड चार्टर्ड यांनी २०१५ पासून त्यांचे भारतातील कामकाज ठरावीक क्षेत्रापुरतेच सीमित राखले आहे.