मुंबई : देशाच्या उद्योगजगतात परोपकार जपण्यात अग्रस्थानी असलेले अझीम प्रेमजी यांनी विद्यमान २०२१-२२ आर्थिक वर्षांत तब्बल ९,७१३ कोटी रुपये देणगी रूपाने खर्च केले आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी २७ कोटी रुपयांचे दानकर्म ते करीत आले आहेत.

करोना विषाणूजन्य साथीने ग्रासलेल्या या कालावधीत अव्वल सॉफ्टवेअर निर्यातदार विप्रोचे संस्थापक राहिलेले प्रेमजी यांचे दातृत्व निधीत मोठी वाढ झाली आहे. भारतातील परोपकार कर्त्यांची २०२१ सालाची यादी ‘एडेलगिव्ह हुरून’ यांनी संयुक्त सर्वेक्षणाअंती गुरुवारी प्रसिद्ध केली, त्यात प्रेमजी अग्रस्थानी असून, ‘एचसीएल’चे शिव नाडार हे १,२६३ कोटी रुपयांच्या देणगीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी हे तिसऱ्या स्थानी असले तरी त्यांनी दिलेल्या देणग्यांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी ५७७ कोटी रुपयांचे आहे. तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढय़ उद्योगपती गौतम अडाणी हे त्यांनी दिलेल्या १३० कोटींच्या देणगीसह या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.

कुमारमंगलम बिर्ला – ३७७ कोटी , नंदन निलेकेणी १८३ कोटी हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.