‘बजाज ऑटो’ची २,५०० कोटींची समभाग पुनर्खरेदी

दुचाकी क्षेत्रातील अग्रणी कंपनी बजाज ऑटोने सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २,५०० कोटी रुपयांपर्यंत मूल्याच्या ५४.३५ लाख समभागांच्या पुर्नखरेदीचा (बायबॅक) निर्णय घेतल्याचे घोषित केले आहे.

bajaj bike
संग्रहित छायाचित्र

मुंबई : दुचाकी क्षेत्रातील अग्रणी कंपनी बजाज ऑटोने सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २,५०० कोटी रुपयांपर्यंत मूल्याच्या ५४.३५ लाख समभागांच्या पुनर्खरेदीचा (बायबॅक) निर्णय घेतल्याचे घोषित केले आहे. प्रत्येकी ४,६०० रुपये किमतीला प्रस्तावित ही समभाग खरेदी म्हणजे बजाज ऑटोच्या ३८१२.८० रुपये या शुक्रवारच्या बंद भावाच्या तुलनेत २०.६४ टक्क्यमंचे अधिमूल्य मिळवून देणारी आहे. कंपनीच्या या निर्णयाने शुक्रवारी समभागाने जवळपास एक टक्क्याने उसळी घेत ३,९५३ रुपये असे दिवसभरातील उच्चांकी मूल्य गाठले. चालू वर्षांत बजाज ऑटोचा समभाग १९ टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीकडे गेल्यावर्षी सप्टेंबर २०२१ अखेर १७,५२६ रुपयांची रोखता उपलब्ध होती. त्यात चालू  वर्षांत भर पडली आहे. ३१ मार्च २०२१ अखेर १७,६८९ कोटी रुपयांची रोखता उपलब्ध आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, समभाग पुनर्खरेदीने कंपनीच्या प्रति समभाग मिळकतीत (ईपीएस) सुधार होतो, शिवाय मलूल बाजारस्थितीत समभागाचे मूल्य तरतरीत राखता येते. भागधारकांना त्यांच्या हाती असलेल्या समभागांवर भरभरून लाभ देऊन खूश करण्याचा हा नवीन रुळत असलेला प्रघात आहे.

एक लाख कोटींची मूल्यवानता

समभाग पुनर्खरेदीच्या निर्णयावर संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर बजाज ऑटोचा समभाग सोमवारच्या व्यवहारात १.२९ टक्क्यांनी उंचावत ३,८६२.०५ रुपयांवर बंद झाला. बजाज समूहातील या कंपनीचे बाजारमूल्य यामुळे १,११,७५४ कोटी रुपयांवर गेले. करोना टाळेबंदीमुळे दुचाकींच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम झाला होता, दुचाकींच्या विक्रीने अजूनही वेग घेतलेला नाही. तरीही चालू वर्षांत मुंबई शेअर बाजारात बजाज ऑटोचा समभाग  १९ टक्क्यांनी वधारला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bajaj auto repurchases leading company board of directors ysh

Next Story
अर्थव्यवस्थेची मे महिन्यात विकासाच्या दिशेने आगेकूच; ब्लूमबर्गच्या अहवालात आठपैकी पाच निर्देशांकांत सुधारणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी