मुंबई : पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (महाबँक) निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या डिसेंबरअखेर तिमाहीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीअखेर बँकेने ३२५ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला.

अनुत्पादित कर्जाचे कमी झालेले प्रमाण आणि त्यामुळेच अशा कर्जासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीचे प्रमाण घटल्याने बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. बँकेला दुसऱ्या तिमाहीअखेर १५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी ए. एस. राजीव यांनी गुरुवारी दिली. करोनाकाळात अर्थव्यवस्थेची स्थिती बँकिंग व्यवसायाच्या दृष्टीने खडतर असताना, नफाक्षमतेच्या सर्व निकषांवर उठून दिसेल अशी बँकेने कामगिरी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. बँकेचे एकूण उत्पन्न तिमाहीत ३,८९३ कोटी रुपयांवर गेले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत  ३,५८२ कोटी होते. बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाणही २.४९ टक्क्यांवरून कमी होत ते सरलेल्या तिमाहीत १.२४ टक्क्यांवर घसरले आहे. बँकेच्या व्यवसायात वाढ होऊन तो डिसेंबरमध्ये ३,१५,६२० कोटींवर पोहोचला आहे.