सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ महाराष्ट्रने ‘महामोबाइल’ या नावाने मोबाइल अ‍ॅप नुकतेच सादर केले. यातून बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या ठेवी, कर्ज खाते, निधी हस्तांतरण, वेगवेगळ्या देयकांचा भरणा आणि अन्य प्रकारच्या सेवांसाठी बँकेला करावयाची विनंती आपल्या मोबाइल फोनचा वापर करून करता येईल.
या निमित्ताने झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. मुनोत, कार्यकारी संचालक आर. आत्माराम आणि आर. के. गुप्ता उपस्थित होते. बँकिंग व्यवहार हे सर्वासाठी सहजसोपे व्हावेत अशा प्रयत्नांतूनच हे नवीन मोबाइल अ‍ॅप आपण बँकेच्या १.८ कोटी ग्राहकांना अर्पण केले आहे, असे मुनोत यांनी याप्रसंगी सांगितले.