‘महाबँके’ची तिमाहीत अग्रेसर कामगिरी

महाबँकेच्या कर्ज वितरणात सरलेल्या तिमाहीत ११.४६ टक्क्य़ांची वाढ होऊन ते १,१५,२३६ कोटी रुपयांवर गेले आहे.

कर्ज व ठेव संकलनांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वश्रेष्ठ

मुंबई : तिमाही निकालांद्वारे प्रस्तुत आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्र (महाबँक) कर्ज वितरण आणि बचत ठेवींच्या संग्रहणात अग्रेसर ठरली आहे.

पुण्यात मुख्यालय असलेल्या महाबँकेच्या कर्ज वितरणात सरलेल्या तिमाहीत ११.४६ टक्क्य़ांची वाढ होऊन ते १,१५,२३६ कोटी रुपयांवर गेले आहे. २०२१-२२ आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून जाहीर आकडेवारीत कर्ज वितरणात साधली गेलेली सर्वाधिक तिमाही वाढ आहे. पंजाब अँड सिंध बँकेने त्या खालोखाल ९.५३ टक्क्य़ांची वाढ साधून, सप्टेंबर २०२१ अखेर एकूण कर्ज वितरण ६७,५७४ कोटी रुपयांवर नेले आहे.

उल्लेखनीय म्हणजे महाबँकेचे किरकोळ ग्राहक, कृषी क्षेत्र आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) या घटकांसाठी कर्ज वितरण सरलेल्या तिमाहीत तब्बल १४.२४ टक्क्य़ांनी वाढून, ७०,५१५ कोटी रुपयांच्या पातळीवर गेले आहे.

शिवाय ठेव संकलनाच्या आघाडीवर महाबँकेने १४.४७ टक्क्य़ांचा सर्वाधिक दर नोंदवून बाजी मारली आहे. येथेही पंजाब अँड सिंध बँकेला तिने किंचित पिछाडीवर टाकले आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला सरलेल्या तिमाहीत ठेवींमध्ये ९.६९ टक्के दराने वाढ साधता आली आहे. तथापि महाबँकेच्या १.८१ लाख कोटी रुपयांच्या एकूण ठेवींच्या तुलनेत स्टेट बँकेच्या एकूण ठेवी २० पटीने अधिक म्हणजे ३६.९० लाख कोटी रुपये इतक्या आहेत.

चालू खाते आणि बचत खाते यांचे एकत्रित प्रमाण अर्थात ‘कासा ठेवीं’च्या बाबतीत महाबँक २२ टक्के वाढीसह, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरली आहे. दुसऱ्या तिमाहीतील या मोठय़ा वाढीच्या परिणामी बँकेच्या एकूण ठेवीत ‘कासा ठेवीं’चे प्रमाण ५४ टक्के अर्थात ९७,८८९ कोटी रुपये इतके आहे. या दमदार कार्य परिणामांमुळे, महाबँकेचा एकूण व्यवसाय सप्टेंबर २०२१ अखेर वार्षिक तुलनेत १३.२७ टक्क्य़ांनी वाढून २.९७ लाख कोटी रुपये झाला आहे. बँकेचा निव्वळ नफाही गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर असलेल्या १३० कोटी रुपयांवर वाढून यंदा सप्टेंबरअखेर २६४ कोटी रुपये असा दुप्पट झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bank of maharashtra tops in terms of loan and deposit collection zws

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या