scorecardresearch

करपश्चात सरस परताव्यासाठी रोखे गुंतवणूकच सर्वोत्तम!

रोखे बाजारात देखील शेअर बाजाराप्रमाणे रोखे हस्तांतरणाचे (खरेदी-विक्री) व्यवहार पार पडत असतात.

मुंबई : बँकेतील मुदत ठेवी ते शेअर बाजार या दोन टोकांच्या दरम्यान पैशाने पैसा वाढविण्याचे गुंतवणुकीचे जे प्रकार उपलब्ध आहेत, त्यात सुरक्षितता, तरलता आणि करपश्चात परतावा अशा तिन्ही अंगांनी रोखे गुंतवणूक हा खरोखरच मोलाचा मध्यममार्ग असून, सामान्य गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक भांडारात रोखेसंलग्न पर्यायाला स्थान असायलाय हवे, असे आग्रही प्रतिपादन ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रमात गुंतवणूक विश्लेषक समीर नेसरीकर यांनी रविवारी केले.

अर्थसंकल्पोत्तर गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रम रविवारी सकाळी दूरचित्रसंवाद माध्यमातून पार पडला. गुंतवणूकदार जागराच्या या मालिकेतील ‘कर्जरोखे  – गुंतवणुकीचा मध्यममार्ग’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात गुंतवणूक विश्लेषक आणि स्तंभलेखक समीर नेसरीकर आणि आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार शिक्षण विभागाचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. गुंतवणूकदारांकडून आलेल्या प्रश्न व शंकांचे निरसनही वक्त्यांनी केले. वक्ते आणि श्रोते यांच्यातील दुवा म्हणून सुनील वालावलकर यांनी समन्वयकाची भूमिका बजावली.

रोखे बाजारात देखील शेअर बाजाराप्रमाणे रोखे हस्तांतरणाचे (खरेदी-विक्री) व्यवहार पार पडत असतात. तथापि मुबलक तरलता आणि आज विक्री केल्यास दुसऱ्या दिवशी बँक खात्यात रक्कम येण्याइतकी रोखता या गुंतवणुकीत आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याइतका लाभ जरी होत नसला तरी बँक मुदत ठेवींपेक्षा अधिक फायदा जरूर मिळतो. कोणतीही गुंतवणूक करताना करपश्चात लाभ प्राधान्याने लक्षात घ्यायला हवा, त्या अंगानेही रोखेसंलग्न गुंतवणूक सरस ठरते, असे नेसरीकर यांनी सांगितले.

‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ असे रोखे बाजाराचे वर्णन करता येईल. रोखे बाजारात व्याज कमी मिळत असले तरी मुद्दल मात्र शाबूत राहते. गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळवायचा असेल तर मग अधिक जोखीम देखील घ्यावी लागते. रोखे बाजारातील परतावा  मुख्यत: महागाई, क्रयशक्ती, क्रेडिट रिस्क, मुदतपूर्तीचा कालावधी, मागणी-पुरवठा यांच्यावर अवलंबून असतो. व्याजदर आणि रोखे यांचा व्यस्त संबंध असतो. म्हणूनच रोखे बाजारात व्याजदर जोखीम आणि पत जोखीम अशा दोन प्रकारच्या जोखमींना समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे नेसरीकर म्हणाले.

पुढील सत्रात ‘म्युच्युअल फंडांची निवड कशी?’ यावर मार्गदर्शन

मुंबई : ‘लोकसत्ता अर्थभान’ या अर्थसंकल्पोत्तर गुंतवणूकदार जागराच्या या मालिकेतील पुढील सत्र हे ‘म्युच्युअल फंड – विनागुंता गुंतवणूक’ या विषयावर रविवार, २० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता, दूरचित्रसंवाद माध्यमातून योजण्यात आले आहे.  महिनागणिक देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची गंगाजळीत निरंतर वाढ सुरू असून, जानेवारीत त्याने ३८ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. म्यु्च्युअल फंडातील नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’ खात्यांनी ऐतिहासिक पाच कोटींपुढे मजल मारली आहे. हे या गुंतवणुकीचे वाढते आकर्षण सुजाणतेने आहे काय आणि सुज्ञपणे निवडीचे निकष कोणते या मुद्दय़ांवर गुंतवणूकविषयक अभ्यासक आणि स्तंभलेखक वसंत कुळकर्णी या निमित्ताने मार्गदर्शन करतील.

सहभागासाठी..

वाचकांना  http://tiny.cc/LS_Arthabhan_13Feb या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक ठरेल अथवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी करता येईल.

९ विषय : म्युच्युअल फंड –             

      विनागुंता गुंतवणूक

९ मार्गदर्शक : वसंत कुळकर्णी

९ कधी : रविवार, २० फेब्रुवारी

९ वेळ : सकाळी ११ वाजता

रोखेसंलग्न (डेट) फंड हा गुंतवणूक व्यवस्थापनाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. विशेषत: सध्या बँकांच्या मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या अल्प व्याजदराची परिस्थिती लक्षात घेता डेट फंडांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. सुरक्षितता, तरलता, परतावा आणि कर कार्यक्षमता अनुभवण्यासाठी डेट फंडामध्ये गुंतवणूक करा. डेट फंडात तीन वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक केली तर ‘इंडेक्सेशन’ सुविधेसह कराचा भार लक्षणीय कमी करणे शक्य आहे.

– शैलेंद्र दीक्षित, पश्चिम विभागीय व्यवस्थापक,    गुंतवणूकदार शिक्षण, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bank term deposits to the stock market bonding is the best way get good post tax return akp