मुंबई : देशातील बँकांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध असून, त्यांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण (एनपीए) ६.५ टक्क्यांवर या नीचांकी पातळीवर रोडावले आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर अनेक समस्या उद्भवल्या असतानाही, बँकांच्या या सक्षमतेमुळ भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे, असे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी उद्योग महासंघाच्या (सीआयआय) बैठकीत केले.

देशाकडे पुरेशी परकीय गंगाजळी उपलब्ध असून चालू खात्यातील तूटदेखील आटोक्यात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची गरज भागविण्यासाठी आणि तरलता योग्य पातळीवर राखण्यासाठी गेल्या दोन वर्षांत मध्यवर्ती बँकेने १७ लाख कोटींचा निधी अर्थव्यवस्थेत प्रवाहित केला आहे, असे दास यांनी स्पष्ट केले.

सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असून रिझव्‍‌र्ह बँकेकडून अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणाऱ्या विविध ६० प्रकारच्या उच्च-वारंवारता निर्देशकांचा नियमितपणे मागोवा घेतला जातो. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र अक्षय्य ऊर्जा स्रोतांकडे देशाचे वेगाने वळण सुरू आहे.