देशातील दुसरी मोठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल-शुद्धिकरण कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल)ने मुंबईतील माहुलस्थित आपल्या प्रकल्पाच्या अद्ययावतीकरणासाठी १,४१९ कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प येथून हलविण्याच्या कंपनीच्या हालचाली असल्याचा अटकळीला यातून पूर्णविराम मिळाला आहे.
वार्षिक १२ दशलक्ष टन क्षमतेच्या या रिफायनरीतील जुन्या क्रूड प्रोसेसिंग संयंत्राच्या जागी प्रत्येकी ६ दशलक्ष टन क्षमतेच्या क्रूड आणि व्हॅक्युम डिस्टिलेशन संयंत्र बसविले जाणार आहे. नवीन संयंत्र कार्यान्वित झाल्यानंतर जुने संयंत्र निकाली काढले जाणार असल्याने, येथून उत्पादनात कोणताही खंड पडणार नाही, असा कंपनीने निर्वाळा दिला आहे. जुन्या संयंत्रातून उद्भवणाऱ्या संभाव्य सुरक्षितता आणि पर्यावरणीय हानीच्या जोखमांची नव्या संयंत्रातून पुरेपूर काळजी घेण्यात आली असून या धोक्यांचा बंदोबस्त केला गेला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. पुढील वर्षभरात म्हणजे मे २०१५ पासून नवीन संयंत्र पूर्णपणे कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
अशाच धर्तीचे अद्ययावतीकरण बीपीसीएलने आपल्या कोची रिफायनरीबाबतीतही हाती घेतले असून, त्यायोगे या प्रकल्पाची सध्याची ९.५ दशलक्ष टन उत्पादन क्षमता प्रत्यक्षात १५.५ दशलक्ष टनांवर जाणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाची यांत्रिकीकरण मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होऊन, मे २०१६ पासून उत्पादन सुरू होऊ शकेल. आसाममधील नुमालीगड रिफायनरी आणि मध्य प्रदेशस्थित बिना रिफायनरीच्या उत्पादन क्षमतांमध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्याचा विस्तार कार्यक्रम कंपनीने हाती घेतला असून, त्यासाठी १३,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आखले आहे.