बिर्ला सन लाइफचे बालसुब्रमण्यम यांचा विश्वास

देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची  मालमत्ता लवकरच २० लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, असा विश्वास बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी ए. बालसुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. कंपनीच्या आगामी योजनांबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. या वेळी कंपनीचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) महेश पाटील व सह मुख्य गुंतवणूक अधिकारी (रोखे) मनीष डांगी आदी उपस्थित होते.

बालसुब्रमण्यम म्हणाले की, गेले आर्थिक वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी संस्मरणीय ठरले आहे. देशात समभाग गुंतवणूक ही सामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीचा एक भाग बनली आहे. याचा परिणाम म्युच्युअल फंड उद्योगात नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या महिन्यागणिक वाढताना दिसत आहे. दर महिन्यात सरासरी १० लाखांहून अधिक नवीन म्युच्युअल फंड खाती सुरू झाली आहेत. एप्रिल महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या खात्यांची संख्या १.४० कोटींवर पोहोचली आहे. यांपैकी ५० टक्के खाती ही तळाच्या शहरांतील आहेत. नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या खात्याच्या सरासरी रकमेत वाढ झाली असून एप्रिल महिन्याअखेर प्रति खाते सरासरी गुंतवणूक ४,२०० रुपये झाली आहे. गुंतवणूकदारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता २० लाख कोटींचा टप्पा पार करेल, असेही ते म्हणाले.

बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) महेश पाटील या वेळी म्हणाले की, यापूर्वी परकी वित्तसंस्था बाजारात विक्री करीत असे तेव्हा भांडवली बाजार मोठय़ा घसरणीला सामोरे जात असे. वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे हे चित्र बदलले असून परकी वित्तसंस्थांचा प्रभाव कमी झाला. निफ्टीने ९,४००चा टप्पा पार केला असला तरी वैयक्तिक गुंतवणूकदरांनी काळजी करावी, असे नजीकच्या काळात विपरीत दृष्टिपथात नसून आपले मालमत्ता विभाजन तपासून पाहण्याची वेळ आली आहे. आपल्या वित्तीय ध्येयानुसार योग्य तो बदल करण्याचे त्यांनी सुचविले. मागील दोन-तीन वर्षांत बिर्ला म्युच्युअल फंडाने जी गुंतवणूक धोरणे अवलंबली त्यांचा परिणाम आता दिसून येत आहे. भविष्यातदेखील बदलत्या आर्थिक परिणामांनुसार बिर्ला म्युच्युअल फंड गुंतवणूक धोरणात योग्य ते बदल करताना दिसून येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. केवळ निर्देशांकाचा ‘पीई’ पाहून भारतीय समभाग महाग आहेत, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. निवडक समभागांचे भविष्यातील २-३ वर्षांनंतरच्या उत्सर्जनाचा विचार केल्यास समभागांचे बाजारमूल्य महाग आहे असे म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले.