मुंबई: वातानुकूल यंत्रातील अग्रेसर नाममुद्रा ब्ल्यू स्टारने यंदाच्या उन्हाळय़ासाठी ‘परवडण्यायोग्य किमती’त स्प्लिट प्रकारातील वातानुकूल उपकरम्णांची (एसी) विस्तृत श्रेणी ग्राहकांसाठी खुली केली आहे. तापमानाचा पारा विक्रमी पातळीवर वाढलेल्या यंदाच्या करोना जोर ओसरल्यानंतरच्या हंगामाबाबत कंपनी खूपच आशावादी असून, २०२२ मध्ये या बाजारपेठेचा १४ टक्के हिस्सा काबीज करण्याची योजना आखली आहे.

विशेषत: तृतीय, चतुर्थ आणि पाचव्या श्रेणीतील शहरांच्या बाजारातील किमतीबाबत संवेदनशील ग्राहक आणि प्रथमच खरेदीदार यांच्यासाठी स्वस्त स्प्लिट एसीची श्रेणी आणली आहे. इन्व्हर्टर, स्थिर गती आणि विंडो एसी या श्रेणीमध्ये कंपनीचे जवळपास पन्नास नवीन मॉडेल्स यातून बाजारात आले आहेत. या श्रेणीत थ्री-स्टार, फोर-स्टार आणि फाइव्ह-स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी हे ३० हजार ९९० रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध झाले आहेत. ०.८ टन ते २ टनापर्यंतच्या विविध कूलन क्षमतेमध्ये ही उपकरणे उपलब्ध झाली आहेत.

कंपनीच्या अन्य उत्पादनांप्रमाणेच उच्चतम दर्जा, विश्वासार्हता आणि टिकाऊपणा याची खात्री ही नवीन श्रेणीही देते, असा दावा ब्ल्यू स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन यांनी आभासी पत्रकार परिषदेत केला. निवासी एसीशी संबंधित बाजारपेठेचा संपूर्ण परीघ व्यापण्यासाठी अतिशय कल्पकतेने उत्पादन आणि किंमत यांचे योग्य मिश्रण यातही साधले गेले आहे.