scorecardresearch

Rupee Bank License Case: रुपी बँकेला कायमचं टाळं लागण्याच्या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

बँकेने केलेला शेवटचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. आजपासून या बँकेविरोधात अवसायानाची कारवाई सुरू होणार होती.

Rupee Bank License Case: रुपी बँकेला कायमचं टाळं लागण्याच्या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नियमांचे उल्लंघन आणि आर्थिक अनियमिततांमुळे तोट्यात गेलेल्या रुपी सहकारी बँकेला कायमचे टाळे लागण्याच्या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ८ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. या आदेशामध्ये रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश आरबीआयने दिले होते. मात्र आता या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती बँकेचे अधिकारी सुधीर पंडीत यांनी दिली आहे.

रुपी बँकेला वाचविण्याचे न्यायालयीन आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सर्व प्रयत्न असफल ठरले असं वाटत असतानाच बँकेला कायमचं टाळं लागण्याच्या दिवशीच न्यायालयाने आरबीआयच्या कारवाईला स्थिगिती दिली आहे. ८ ऑगस्टच्या आदेशामध्ये या बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश आरबीआयकडून जारी करण्यात आलेले. मात्र हा निर्णय आता १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करावा असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हा निर्णय म्हणजे या बँकेमध्ये अजूनही पैसे अडकून असलेल्या खातेदारांसाठी मोठा दिसाला असल्याचं सांगितलं जात आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेली सहा आठवड्यांची मुदत काल संपली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाविरोधात रुपी बँकेने केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे दाद मागितली होती. मात्र, त्यावर कोणताही अंतरिम दिलासा न देता १७ ऑक्टोबरला सुनावणी ठेवण्यात आली असल्याने आज न्यायालयाने १७ तारखेपर्यंत बँकेचा परवाना रद्द करु नये असे निर्देश दिले आहेत. अखेरचा प्रयत्न म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न बँकेने केला आणि त्यामध्ये किमान सुनावणीपर्यंत परवाना रद्द होणार नाही इतका दिलासा देण्यात आला आहे. आजपासून या बँकेविरोधात अवसायानाची कारवाई सुरू होणार होती. ही कारवाईही पुढे ढकलली गेल्याचं समजेत.

न्यायालयाच्या निर्णयामुळे सहकार क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. यापुढे न्यायालयाने सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत स्वतंत्र धोरण आखून त्याला मान्यता द्यावी. त्यानुसार आरबीआयला निर्णय घ्यावे लागतील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत. रुपीबाबत अंतिम निर्णय देताना न्यायालयाने कायमस्वरूपी सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून द्यावीत आणि संपूर्ण सहकारी बँक क्षेत्राला दिलासा द्यावा.- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन

शतकभराचा वारसा असलेल्या आणि १९१२ मध्ये स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील या जुन्या बँकेवर गेली काही वर्षे प्रशासकीय राजवट आहे. आजपर्यंत ‘रुपी’कडे ८३० कोटी रुपयांची रोखता, ८० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या बँकेची सुमारे १०० कोटी रुपयांची कर्जवसुली बाकी आहे. सुधारित ठेव विमा संरक्षण कायदा २०२१ च्या तरतुदींनुसार ठेव विमा महामंडळाने ६४ हजार २४ ठेवीदारांच्या (५ लाखांपर्यंत ठेव असणाऱ्या) ७००.४४ कोटींच्या ठेवी परत केल्या आहेत. मात्र, अजूनही काही हजार ठेवीदारांचे पैसे बँकेकडे अडकले आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bombay high court stay on 110 year old rupee bank license cancellation order of rbi till 17 oct 2022 scsg

ताज्या बातम्या