रोमांचकारी ६०,३३३ चा टप्पा

अभूतपूर्व तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या पदरीही भरभरून लक्ष्मीचे दान पडत आहे.

मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी शुक्रवारी सेन्सेक्सच्या साठ हजारी प्रवासाचा दलाल मंडळींसह केक कापून आनंद साजरा केला.

तेजीवाल्यांच्या खरेदीच्या लाटा; ‘सेन्सेक्स’ला अलोट भरते

मुंबई : भांडवली बाजारासाठी सर्वार्थाने संस्मरणीय आणि रोमांचकारी २०२१ सालात, ५० हजारांपाठोपाठ ६० हजारांचा ऐतिहासिक टप्पाही शुक्रवारी प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने लीलया गाठला. ‘निफ्टी’ही १८ हजारांची वेस गाठण्याच्या तयारीत आहे. बाजारावर पूर्ण पकड मिळविलेल्या तेजीवाल्यांकडून सुरू असलेल्या खरेदीच्या लाटांनी निर्देशांक नवनव्या शिखर स्तरांना गाठत चालले आहेत.

या अभूतपूर्व तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या पदरीही भरभरून लक्ष्मीचे दान पडत आहे. छोटय़ा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढविणारी ही बाब असल्याचे खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही निर्वाळा दिला. शिवाय वाढत्या लसीकरणाने तिसरा लाटेचा निवळत चाललेला धोका गुंतवणूकदारांसाठी आश्वासक ठरला आहे.

जागतिक बाजारातून नकारात्मक संकेतांकडेही दुर्लक्ष करत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने शुक्रवारी प्रथमच ६०,००० अंशांचा टप्पा गाठत इतिहास रचला. दिवसाच्या व्यवहारात त्याने ६०,३३३ च्या शिखराला स्पर्श केला. गुरुवारी निर्देशांकाने ९५८ अंशांची झेप घेतली होती. त्यात आणखी १६३.११ अंशांची भर घालून सेन्सेक्स शुक्रवारचे व्यवहार थंडावले तेव्हा ६०,०४८.४७ या विक्रमी पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही ३०.२५ अंशांच्या कमाईसह १७,८५३.२० ची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीही दिवसभरातील व्यवहारात १८ हजारांनजीक, १७,९४७.६५ उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. संपूर्ण आठवडय़ात सेन्सेक्समध्ये १,०३२.५८ अंशांची, तर निफ्टीमध्ये २६८.०५ अंशांची वाढ झाली आहे. 

वस्तू व सेवा कराचे वाढते संकलन आणि प्रत्यक्ष करातही दिसून आलेली मोठी वाढ हे घटक अर्थव्यवस्था दमदारपणे फेरउभारीच्या दिशेने अग्रेसर झाली असल्याचेच दाखवून देतात, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंजाबमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना प्रतिपादन केले. हीच बाब देशाच्या भांडवली बाजाराला स्फुरण देणारी असून, छोटय़ा गुंतवणूकदारांचा यातून आत्मविश्वास दुणावत असून, बाजारात गुंतवणूक करण्याची त्यांची उत्सुकता वाढली आहे, असे विधानही त्यांनी केले.

– सध्या बाजाराचे मूल्यांकन महागडे आहे. मात्र दुसरीकडे अर्थव्यवस्थेतील वाढ सुस्पष्टपणे दृष्टिपथात असल्याने अशा स्थितीत समभाग किंवा समभागसंलग्न साधनांमध्ये गुंतवणूक कमी करण्याचा सल्लाही देता येणार नाही, असे ‘वॉटरफिल्ड अ‍ॅडव्हायजर्स’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी निमिष शाह म्हणाले.

  • सेन्सेक्सने ६० हजारांपुढचा टप्पा गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी सध्या उत्तम व्यवस्थापन व  चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्या गुंतवणुकीसाठी काटेकोरपणे निवडायला हव्यात. निर्देशांकाची पातळी ही फक्त एक संख्या असते. वास्तविक बाजाराचे सूचित हे या संख्येपेक्षा खूप वेगळे असते. अशा स्थितीत गुंतवणूक ही टप्याटप्प्यानेच करावी. एकाच वेळी संपूर्ण निधी बाजारात गुंतवू नका, असा सल्ला ‘कोटक सिक्युरिटीज’चे समभाग संशोधन विभागाचे प्रमुख श्रीकांत चौहान यांनी दिला.

साठीचा टप्पा ३१ वर्षांतच!

मुंबई : सेन्सेक्सचा १,००० ते ६०,००० अंशांचा प्रवास हा ३१ वर्षांच्या कालावधीत घडला. उल्लेखनीय म्हणजे त्यापैकी शेवटच्या पाच हजारांचा पल्ला अवघ्या २९ कामकाज दिवसांत (एकंदर ४२ दिवस) गाठला गेला आहे. करोनामुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि टाळेबंदीमुळे मंदावलेले उद्योगचक्र अशा बिकट परिस्थितीत हे घडून आले आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्याच्या स्पष्ट संकेतांनंतर, बाजारावर तेजीवाल्यांनी पूर्ण वरचष्मा मिळविला. परिणामी, सेन्सेक्सने पुढच्या दशसहस्राचे टप्पे भरधाव व अथकपणे पार पाडले आणि शुक्रवार, २४ सप्टेंबर २०२१ ला ६०,३३३ हजारांचे ऐतिहासिक उच्चांकी शिखरही गाठले गेले. ५०आणि ६० हजार हे दोन्ही महत्त्वाचे टप्पे २०२१ या एका वर्षांतच गाठले गेल्याचे त्यामुळे पाहता आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Booming buying waves fills the sensex a lot ssh

फोटो गॅलरी