‘न्यू डेव्हलपमेन्ट बँक’ या ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी भारत पहिली सलग सहा वर्षे विराजमान होणार असून येत्या दोन वर्षांतच तिचे मुख्यालय चीनच्या शांघाय येथे अस्तित्वात येईल. भारतानंतर ब्राझील आणि रशियाला या बँकेचे अध्यक्षपद भूषविता येईल; मात्र त्यांचा कालावधी प्रत्येकी पाच वर्षेच राहणार आहे.
पाच प्रमुख विकसनशील राष्ट्रांची पहिली बँक स्थापन करण्याचा मार्ग अखेर मंगळवारी उशिरा मोकळा झाला. प्राथमिक १०० अब्ज डॉलर भागभांडवलासह या बँकेची स्थापना करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बँकेसाठी चलन राखीव तरतूद म्हणून सर्वाधिक ४१ अब्ज डॉलरची भागीदारी चीनने नोंदविली आहे.
भारत, रशिया आणि ब्राझील हे प्रत्येकी १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असून दक्षिण आफ्रिका ५ अब्ज डॉलरचे भांडवल ओतेल.
उपरोक्त देशांमध्ये झालेल्या करारानुसार, बँकेचे मुख्यालय चीनच्या शांघाय येथे राहणार आहे. शांघाय हे जगातील तिसरे मोठे वित्तीय केंद्र आहे. येत्या दोन वर्षांत बँकेच्या अस्तित्वासह मुख्यालयही आकार घेईल.
बँकेचे पहिले अध्यक्षपद भारत भूषवेल. देशाचा कालावधी सहा वर्षे असेल. यानंतर ब्राझील व रशियाला ही संधी मिळेल. मात्र त्यांचा कालावधी हा एक वर्षांनी कमी असेल. तर नव्या विकास बँकेचे विभागीय केंद्र ब्राझीलमध्ये राहणार आहे.  सहाव्या ब्रिक्स परिषदेचा बुधवारी समारोप झाला. पुढील परिषद रशियात होणार आहे.
विकसित देशांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक ही वित्तीय संस्था असल्याने विकसनशील राष्ट्रांकडे निधीसाठी दुर्लक्ष होत असल्याची भारतासह या गटातील सदस्य राष्ट्रांची तक्रार होती. त्यासाठीच नव्या ब्रिक्स बँकेच्या रुपात समांतर व्यवस्था आकारास येत आहे.

ऐतिहासिक!
नवी ब्रिक्स बँक स्थापन करणे आणि चलन राखीव तरतूद करणे हे खरोखरीच ऐतिहासिक आहे. संबंधित देशांमध्ये यामुळे आर्थिक सहकार्य येईल व ते भविष्यात एका नव्या टप्प्यावर पोहोचेल.
– सिद्धार्थ बिर्ला, फिक्की

उत्कृष्टच!
ब्रिक्स देशप्रमुखांकडून एक उत्कृष्ट पाऊल नव्या बँकेच्या माध्यमातून उचलले गेले आहे. विकसनशील देशांनाही आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकेल. पायाभूत सुविधा प्रकल्पांना सहकार्य मिळेल.
– चंद्रजीत बॅनर्जी, सीआयआय