भारतातील गुंतवणूकपूरक वातावरणासाठी आर्थिक सुधारणा उत्तमरित्या प्रत्यक्षात आल्या पाहिजेत, अशी आवश्यकता अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक्ट्स (जीई) चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ इमेल्ट यांनी मांडली आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या इमेल्ट यांनी सोमवारी राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर आपली भारताविषयीची भूमिका स्पष्ट केली. भारतातील विदेशी गुंतवणुकीच्या धोरणाबाबत ‘लाल फितीतील कारभार आटोक्यात आणा’ असा सल्लाच त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिला.
भारतात आर्थिक सुधारणा त्वरेने राबविले गेल्यास हा देश विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरेल, असा विश्वासही इमेल्ट यांनी यावेळी व्यक्त केला. आर्थिक सुधारणांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन योग्य असून त्याची अमलबजावणी योग्यरितीने होईल, असा विश्वास आपल्याला असल्याचे ते म्हणाले.
भारताशी गेल्या तीन दशके संबंध असलेल्या जीईच्या माध्यमातून आपल्याला आता येथील रेल्वेशी व्यवसाय सहकार्य करायला आवडेल, असा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. देशातील ऊर्जा क्षेत्राबाबत, अनुदानित किंमतीपेक्षा बाजारमूल्याने व्यवहार करण्यास हे क्षेत्र अधिक पुनर्गुतवणुकीचे ठरेल, असे ते म्हणाले. ऊर्जा, आरोग्यनिगा, पाणी या क्षेत्रात कार्य करण्यास उत्तम संधी असल्याचे इमेल्ट यांनी यावेळी नमूद केले.

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सुधारणा राबविण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून होत असलेला आग्रह रास्त असून त्याची त्वरित अमलबजावणीची अपेक्षा ही प्रत्यक्षात देशाला पूर्वीच्या प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाईल.
’  जेफ्री आर. इमेल्टी, जीईचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी.