देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद भांडवली बाजारावरदेखील पाहायला मिळाले. आज बाजार सुरु होताच सेन्सेक्स अर्थात मुंबई शेअर बाजार १५९५ अंकांनी उसळला असून ५६२४२ पर्यंत पोहोचला.

दुसरीकडे निफ्टीविषयी बोलायचं झालं तर आज दिवसाच्या सुरुवातीलाच निफ्टीमध्ये ४१२ अंकांची उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे बाजार दिवसाच्या सुरुवातीलाच १६७५७ अंकांनी सरु झाला. बुधवारी निफ्टी १६३४५.३५ अंकांवर बंद झाला होता.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी तेजी आल्याचे पाहायला मिळतंय. एसबीआय, एशियन पेंट्सच्या शेअरची किंमत सर्वाधिक वाढलीय. त्याखालोखाल अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय, तसेच HUL यांच्यादेखील शेअर्सची किंमत वधारली आहे.

बुधावारी राष्ट्रीय तसेच मुंबई शेअर बाजारात मोठे चढउतार पहायला मिळाले. रशिया आणि युक्रेन या देशांमधील युद्धाचे पडसाद शेअर बाजारावर पडताना दिसले. अमेरिकेने रशियाच्या इंधन, नैसर्गिक गॅसच्या आयातीवर बंदी घातल्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. असे असले तरी मागील तीन दिसवसांपासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी सेन्सेक्स १४६९ अंकांनी उसळून ५४,८९३.७३ अंकांवर पोहोचला होता. शेवटी ५४,६४७.३३ अंकावर स्थिरावला होता. तर बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टी १६,३४५ अंकावर बंद झाल्यानंतर आजच्या भांडवली बाजाराची सुरुवात १६७५७ अंकांनी झाली.