सेन्सेक्सची सहा महिन्यांच्या उच्चांकाला झेप

चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत आश्चर्यकारक झेप नोंदविणाऱ्या सकल राष्ट्रीय उत्पादनाची दखल घेत प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी सहा महिन्यांचा उच्चांकी टप्पा गाठला. परिणामी सेन्सेक्स २९ हजारानजीक पोहोचला, तर निफ्टीने ८,९५० पर्यंत मजल मारली.

मंगळवारच्या तुलनेत २४१.१७ अंश वाढ नोंदविताना सेन्सेक्स बुधवारअखेर २८,९८४.४९ वर पोहोचला. तर दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत ६६.२० अंश भर घालताना निफ्टी ८,९४५.८० वर स्थिरावला.

सत्राच्या सुरुवातीपासूनच तेजी नोंदविणाऱ्या मुंबई निर्देशांकाने लगेचच २९ हजारांच्या टप्प्याला गाठले. दिवसअखेरचा त्याचा बंद स्तर हा ८ सप्टेंबर २०१६ नंतरचा कमाल ठरला. सहा महिन्यांपूर्वी सेन्सेक्स २९,०४५.२८ वर होता. तर सत्रअखेर ८,९५० नजीक पोहोचलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने व्यवहारात ८,९६०.८० पर्यंत झेप घेतली.

निश्चलनीकरणाच्या कालावधीत, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान भारताने ७.१ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन दर गाठल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारच्या बाजारातील व्यवहारानंतर जाहीर केली. त्याचा अपेक्षित परिणाम बुधवारी लगेचच प्रत्यक्षातील बाजारातील व्यवहारांवर उमटला. जागतिक बाजारातील तेजीचीही साथ निर्देशांक वाढीला मिळाली.

सलग सहा व्यवहारात तेजी नोंदविल्यानंतर सेन्सेक्सने गेल्या दोन व्यवहारांत १४९.६५ अंशांचे नुकसान सहन केले होते. फेब्रुवारीमध्ये विक्री वाढलेल्या वाहन क्षेत्राची कामगिरी दखलही बाजाराने बुधवारी घेतली. परिणामी या क्षेत्रातील बाजारात सूचिबद्ध महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटोसारख्या कंपन्यांचे समभागमूल्य ३.१३ टक्क्यांपर्यंत वाढले.

सेन्सेक्समधील टाटा स्टील, डॉ. रेड्डीज्, आयटीसी, सन फार्मा, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, इन्फोसिस, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, सिप्ला आदी ३.६६ टक्क्यांपर्यंत झेपावले. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभागांचे मूल्य तेजीच्या यादीत नोंदले गेले.

कमी मागणी असलेल्या समभागांमध्ये भारती एअरटेल, एनटीपीसी, गेल, रिलायन्स इंडस्ट्रिज, कोल इंडिया, ल्युपिन, विप्रो यांचा क्रम राहिला. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता निर्देशांक सर्वाधिक ३.४६ टक्क्यांनी उंचावला. पाठोपाठ पोलाद, बँक, आरोग्यनिगा क्षेत्र तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.४५ व ०.१३ टक्क्यांनी वाढले.

बाजार भांडवल विक्रमी टप्प्यावर

मुंबई : सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या मुंबई निर्देशांकासह मुंबई शेअर बाजारातील बाजार भांडवलदेखील बुधवारी विक्रमी टप्प्यावर पोहोचले. बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे मूल्य बुधवार सत्रअखेर ११८ लाख कोटी रुपयांवर गेले. गेल्या दोन महिन्यांत बाजाराने १११ ते ११८ लाख कोटी रुपये असा विक्रमी टप्पा सर केला आहे. बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने २९ हजाराला गवसणी घातली होती.