गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर

येत्या आठवडय़ापासून जाहीर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या निकालाबाबत आशा व्यक्त करताना गुंतवणूकदारांनी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सला नव्या उच्चांकावर नेऊन ठेवले. गुरुवारच्या एकाच सत्रातील १२४ अंश वाढीने मुंबई निर्देशांक प्रथमच ३१,३६९.३४ वर पोहोचला. तर ३६.९५ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ९,६७४.५५ द्वारे वरच्या टप्प्याजवळ जाता आले.

गुरुवारच्या सत्रात निफ्टी ९,७००.७० पर्यंत झेपावला. निफ्टीचा ९,६७५.१० हा विक्रमी स्तर ५ जून रोजी नोंदला गेला होता. ३१,२९८.४२ या वरच्या टप्प्यावर सुरुवात करणारा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सत्रात ३१,४६०.७० पर्यंत झेपावला. सेन्सेक्सचा यापूर्वीचा विक्रम १९ जून रोजी ३१,३११.५७ हा होता.

कंपन्यांच्या एप्रिल ते जून या तिमाहीतील वाढत्या नफ्यातील निकालाबरोबरच यंदाच्या मान्सूनचा सरासरीपेक्षा अधिकचा अंदाजही भांडवली बाजाराच्या गुरुवारच्या तेजीच्या पथ्यावर पडला. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरळीत झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ निश्चित आहे, असा विश्वासही गुंतवणूकदारांनी गुरुवारी भांडवली बाजारात समभागांची खरेदी करताना व्यक्त केला.

मुंबई शेअर बाजारात स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील शोभा लिमिटेड, प्रेस्टिज, यूनिटेक, डीएलएफ लिमिटेड, ओमेक्स, एचडीआयएल, गोदरेज प्रॉपर्टीज, फिनिक्स लिमिटेड यांचे समभाग जवळपास ७ टक्क्यांपर्यंत वाढले. हा निर्देशांक १.५७ टक्क्यांनी वाढला. तर बँक क्षेत्रातील स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, येस बँक, कोटक महिंद्र बँक यांचे मूल्य ४.५६ टक्क्यांपर्यंत वाढले. वाहन, पोलाद, आरोग्य निगा निर्देशांक ०.३७ टक्क्यापर्यंत वाढले.

मूल्यवाढ नोंदविणाऱ्या अन्य समभागांमध्ये आयटीसी, कोल इंडिया, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एचडीएफसी लिमिटेड, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज्, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आदी राहिले. बजाज ऑटो, महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, ओएनजीसी, टीसीएस, एनटीपीसी हे एकूण सेन्सेक्सच्या वाढीनंतरही घसरले.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीतील सविस्तर निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची प्रतिक्रियाही आंतरराष्ट्रीय बाजारात उमटली. आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये संमिश्र हालचाल नोंदली गेली. तर युरोपीय बाजारांची सुरुवात तेजीसह झाली.