अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढीचे संकेत दिल्यानंतर भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी काढता पाय घेतला. सेन्सेक्समधील सलग दुसऱ्या सत्रातील घसरण विस्तारताना मुंबई निर्देशांक सत्रातील तळात विसावला.

१८३.७५ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,१५५.५६ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.६० अंश घसरण होऊन प्रमुख निर्देशांक ८,७२४.७० पर्यंत स्थिरावला. सेन्सेक्सचा बंद स्तर हा गेल्या पंधरवडय़ाच्या तळातील ठरला. तर निफ्टीने बुधवारी ८,८०० ची पातळीही सोडली.

येत्या महिन्यात होणाऱ्या अमेरिकी फेडरलच्या पतधोरण बैठकीत मध्यवर्ती बँकप्रमुख जेनेट येलेन यांच्याकडून व्याजदर वाढविण्याची आवश्यकता प्रतिपादन केल्यानंतर जागतिक प्रमुख भांडवली बाजारात घसरण नोंदली गेली. त्याचाच परिणाम येथील प्रमुख निर्देशांकावरही झाला.

मंगळवारच्या किरकोळ घसरणीनंतर बुधवारच्या सत्राची सुरुवात २८,२६९.९२ पर्यंतच्या तेजीने करणारा सेन्सेक्स व्यवहारात २८,३८२.३२ पर्यंत झेपावला. यानंतर मात्र बाजारावर दबाव निर्माण झाला. परिणामी निर्देशांक ०.६५ टक्के घसरणीसह बंद झाला.

सेन्सेक्सचा सत्रातील किमान स्तर २८,१५५ राहिला. निफ्टीचा बुधवारचा प्रवास ८,८०७.९० ते ८,७१२.८५ असा वरच्या स्तरावरून खाली येणारा ठरला.

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स हा सर्वाधिक, १०.३२ टक्के घसरण नोंदविणारा समभाग ठरला. त्याचबरोबर सुमार तिमाही वित्तीय निष्कर्षांवर प्रतिक्रिया देणाऱ्या समभागांमध्ये सन फार्माही समाविष्ट झाला. ४.२५ टक्के मूल्य रोडावत औषधनिर्मिती कंपनीचा समभाग दिवसअखेर ६२२.५० वर आला.

सेन्सेक्समधील १८ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. यामध्ये टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, भारती एअरटेल आदी होते. सेन्सेक्स घसरूनही तेजीच्या क्रमवारीत आयटीसी, टीसीएस, एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, एशियन पेंट्स कायम राहिले.

वाहन, स्थावर मालमत्ता, औषधनिर्मिती क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. हे क्षेत्रीय निर्देशांक ३.५३ टक्क्यांपर्यंत घसरले. किरकोळ गुंतवणूकदारांच्या नफेखोरी धोरणामुळे मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे १.५२ व १.१६ टक्क्यांनी घसरले.

मुंबई शेअर बाजाराच्या नफ्यात घसरण

तब्बल ११६ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उलाढालीचा टप्पा गाठणाऱ्या देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराने गेल्या तिमाहीत नफ्यातील घसरण नोंदविली आहे. मुंबई शेअर बाजाराने ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ६३.७३ कोटी रुपयांच्या नफा कमाविताना वार्षिक १७ टक्के घसरण नोंदविली आहे. बाजाराने चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण १७४.७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले, तर खर्चातील वाढ ११२.३६ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांकरिता करावा लागलेला खर्च २१ टक्के आहे. गेल्याच आठवडय़ात बाजाराची ‘एनएसई’वर सूचिबद्धता झाली.