मुंबई निर्देशांकात शतकी अंश भर; गुंतवणूकदारांची उत्साही खरेदी

मुंबई शेअर बाजार पुन्हा १७ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ८,९५० च्या पुढे

गेल्या दोन सत्रांपासून बंदअखेर २९ हजाराला हुलकावणी देणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारी अखेर हा टप्पा गाठलाच. गुरुवारच्या ११८.९२ अंश वाढीमुळे सेन्सेक्स २९,०४५.२८ वर पोहोचताना त्याच्या गेल्या १७ महिन्यांच्या वरच्या स्तरावर विराजमान झाला. तर ३४.५५ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ८,९५२.५० पर्यंत पोहोचता आले.

गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात काहीशी निर्देशांक वाढीने करणारा मुंबई निर्देशांक सत्रात २८,८५४.५६ पर्यंत तळातही आला. मात्र बाजारात नफेखोरीचे चित्र निर्माण झाल्याने सेन्सेक्सने २९ हजारावरील स्तर गाठला. व्यवहारात त्याची झेप २९,०७७.२८ पर्यंत राहिली.

गुरुवारच्या शतकी निर्देशांक वाढीने आणि त्याच्या २९ हजारापुढील प्रवासाने सेन्सेक्सने त्याचा १३ एप्रिल २०१५ नंतरचा सर्वोच्च टप्पा गाठला आहे. तर गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा प्रवास ८,८९६ ते ८,९६०.३५ दरम्यान राहिला.

सेन्सेक्समधील ३० पैकी २२ कंपन्यांच्या समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये सन फार्मा, टाटा स्टील, ल्युपिन, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, हिंदुस्थान यूनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज्, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो यांचा समावेश राहिला. तर दुपारपूर्वीच्या व्यवहारात निर्माण झालेल्या दबावामुळे गेल, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग सत्रअखेरही घसरणीच्या यादीतच राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, आरोग्यनिगा, ग्राहकपयोगी वस्तू, दूरसंचार आदी ३.०३ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष फायद्याचे राहतील व अमेरिकेतील कमकुवत रोजगार वाढीमुळ फेडरल रिझव्र्ह बँक तूर्त व्याजदर वाढ करणार नाही या आशेवर यापूर्वीच्या काही व्यवहारात बाजारात निर्देशांक तेजी नोंदली गेली होती. या दरम्यान सेन्सेक्सने सत्रात २९ हजाराला स्पर्शही केला होता. मात्र बंदअखेर त्याला हा स्तर अनुभवता आला नाही. तो अखेर गुरुवारी नोंदला गेला.

मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.८३ व ०.१५ टक्क्य़ांनी वाढले. भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचा ओघ कायम राहिल्याने प्रमुख निर्देशांकांमध्ये तेजी नोंदविली गेल्याचे जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शिअल सव्र्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी म्हटले आहे.

आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार झाले. तर युरोपीय बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये सुरुवातीला वाढ होती.

रुपयाच्या भक्कमतेला विश्राम

मुंबई : गेल्या सलग सहा सत्रांपासून डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या भक्कमतेला गुरुवारी विश्रांती मिळाली. पाच पैसे घसरणीसह स्थानिक चलन ६६.४२ रुपयांवर स्थिरावले. अमेरिकी फेडरल रिझव्र्हमार्फत व्याजदर वाढ होणार या भीतीने गेल्या काही सत्रांपासून निर्यातदार तसेच बँकांमार्फत डॉलरला मागणी नोंदली गेली होती. या सहा सत्रात रुपया ८० पैशांनी मजबूत बनला होता. बुधवारी त्याने गेल्या चार महिन्यातील उच्चांक नोंदविला होता.

भेल : नफेखोरीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील भेलचा समभाग २ टक्क्य़ांनी घसरला. त्याला दिवसअखेर १५६.८५ रुपये भाव मिळाला. कंपनीने तिमाहीत ५४ टक्के नफा मिळविल्याने व्यवहारात समभाग बुधवारी १६ टक्क्य़ांनी वाढला होता.

आयआरबी इन्फ्रा : प्रारंभिक खुल्या भागविक्रीकरिता सेबीकडे अर्ज केल्यानंतर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सचे समभाग मूल्य ९.११ टक्क्य़ांनी उंचावले. ४,३०० कोटी रुपये उभारण्याच्या घोषणेनंतर समभाग २५२.०५ रुपयेपर्यंत पोहोचला.

Untitled-13