लाल किल्ल्यावरून शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचे स्वागत गुंतवणूकदारांनी सोमवारी उत्साहाने केले. पंतप्रधानांनी आर्थिक सर्वसमावेशकता आणि भारतीय निर्मिती क्षेत्राला दिलेल्या महत्त्वाने हरखून जात गुंतवणूकदारांनी सेन्सेक्ससह निफ्टीचा थर नव्या सार्वकालिक उच्चांकावर नेऊन रचला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी यापूर्वीच्या विक्रमाच्या हंडय़ा फोडून भांडवली बाजारातही दहीकाला साजरा केला.
सलग पाचव्या सत्रात सुरु राहिलेल्या तेजीच्या उत्सवात सप्ताहारंभीच तब्बल २८७.७३ अंशांची भर पाडत सेन्सेक्सने २६,३९०.९६ अंशांचे नवे तोरण बांधले. तर ८२.५५ अंश वाढीसह निफ्टीनेही ७,८७४.२५ हा इतिहासातील सर्वोच्च टप्पा सोमवारी पार केला. जवळपास महिन्याभरानंतर निर्देशांकांची पुन्हा शिखर स्तरांना सर करणारी भरारी सुरू झाली आहे.
१५ कोटी नव्या ग्राहकांना बँकिंग सेवा परिघात सामावून घेणारी ‘पंतप्रधान जन धन योजना’ व देशात निर्मितीला चालना देणाऱ्या ‘मेक इन इंडिया’चे बिगूल नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात वाजविले होते. यानंतर विस्तारीत साप्ताहअखेर विश्रांती घेत गुंतवणूकदारांनी  अनोखा उत्साहाने बाजार भारलेला दिसला.
२६,१२३.६९ने नव्या सप्ताहाची सुरुवात केल्यानंतर काही क्षणातच सेन्सेक्स २६ हजारांवर येऊन ठेपला, मात्र त्यानंतर त्याने सत्रभर झेप राखली. दिवसाच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी मुंबई निर्देशांक २६,४१३.११ या सर्वोच्च स्तरावर विराजमान झाला. दिवसअखेर त्यात शुक्रवारच्या तुलनेत जवळपास तीन शतकांची भर पडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी व्यवहारात ७,८८०.५० पर्यंत झेपावल्यानंतर नव्या विक्रमासह एक टक्क्याने वधारला. जागतिक बाजारातील सुरुवातीची सकारात्मक कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात उतरलेल्या कच्च्या तेलाच्या दरांनी येथील भांडवली बाजारांना तेजीसह नव्या विक्रमाची जोड दिली.
मुंबईच्या शेअर बाजारात १२ पैकी १० क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले. तेल व वायू, बँक, भांडवली वस्तू, ऊर्जा, पोलाद हे २.६ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदवीत होते. तर सेन्सेक्समधील २४ समभागांचे मूल्य तेजाळले. यामध्ये आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, भेल हे आघाडीवर होते.

गडय़ा पडायचं नाही..!
गेल्या सलग पाच व्यवहारांत मिळून सेन्सेक्सची १,०६१.८२ अंशांची कमाई राहिली आहे. या कालावधीत ४.१९ टक्क्यांनी सेन्सेक्स उंचावला आहे. सेन्सेक्सचा यापूर्वी २५ जुलै रोजी २६,३००.१७ हा व्यवहारातील, तर २४ जुलै रोजी २६,२७१.८५ हा बंदअखेरचा सर्वोच्च स्तर होता. तर निफ्टीची सत्रातील कमाल पातळी २५ जुलै रोजी ७,८४०.९५ व सत्रअखेरची विश्रांती २४ जुलै रोजी ७,८३०.६० अशी होती.

विदेशी गुंतवणुकीचा ओघ ५० अब्ज डॉलरपल्याड जाईल!
आर्थिक सुधारणांचा क्रम सरकारने अखंडपणे सुरू ठेवल्यास आर्थिक वर्ष २०१५ मध्ये विदेशातून गुंतवणुकीचा ओघ विक्रमी ५० अब्ज डॉलरची मात्रा गाठू शकेल, असा विश्लेषकांचा कयास आहे. विद्यमान २०१४ सालात (कॅलेंडर वर्षांत) भांडवली बाजाराच्या निर्देशांकाने जवळपास २७ टक्के झेप घेतली आहे, तर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून तब्बल २६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. आगामी काळातही हाच क्रम सुरू राहील आणि देशांतर्गत आर्थिक सकारात्मकता तर जागतिक स्तरावर विशेषत: उदयोन्मुख राष्ट्रांमध्ये रशियातील भू-राजकीय अनिश्चितता भारताच्या भांडवली बाजाराच्या पथ्यावर पडणारी ठरेल, असा विश्लेषकांचा होरा आहे.