शेअर बाजाराच्या एकंदर अपेक्षेप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या वार्षिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली असली तरी, या पतधोरणातील गव्हर्नर डॉ. डी. सुब्बराव यांच्या कडवेपणाने या कपातीच्या अनुकूलतेवर मात केल्याचे दिसून आले. वध-घटीच्या हिंदोळ्यानंतर दिवसअखेर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ १६० अंशांनी घसरताना दिसून आला. याआधी सलग तीन दिवस व्याजदर कपातीच्या अधीरतेने ‘सेन्सेक्स’ने ४४९ अंशांची कमाई केली होती.  
रिझव्‍‌र्ह बँकेने जरी पाव टक्क्यांची रेपो दरकपात केली असली तरी, एकूण अर्थव्यवस्थेबाबत गव्हर्नर सुब्बराव यांनी केलेले भाष्य अत्यंत कडवे असून ते बाजारासाठी अनपेक्षित होते. महागाई दरात अपेक्षित सुधार होत असल्याबद्दल त्यांनी कोणतेही आश्वासक विधान न केल्याबद्दल बाजारात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. परिणामी गेले काही दिवस व्याजदर कपातीच्या अपेक्षेने       वधारलेल्या बँकिंग, स्थावर मालमत्ता, वाहन उद्योग क्षेत्रातील समभागांची बाजारात जोमाने विक्री करण्यात आली.
सुब्बराव यांच्या वाक्तालावर शेअर निर्देशांकाचे हेलकावे
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांचे पतधोरणविषयक निवेदन सुरू असताना तासाभराच्या कालावधीत, सकाळी ११ ते १२ या दरम्यान निर्देशांकाचे प्रचंड कोनात हेलकावे दिसून आले. उल्लेखनीय बाब म्हणजे सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांचा शुक्रवारचा नीचांक स्तर हा सकाळी ११ वाजून २ मिनिटांनी अनुक्रमे १९,५५२ व ५,९३० असा होता. सुब्बराव यांचे भाषण सुरू होताना ११ वाजता ‘सेन्सेक्स’ कालच्या तुलनेत १६० अंशांनी घसरला होता, तर भाषण संपल्यावर १२ वाजेपर्यंत पूर्ण तोटा भरून काढण्याइतपत तो सावरलेला दिसून आला. किंबहुना १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत दोन्ही निर्देशांक कालच्या तुलनेत किंचित कमाई करून वधारलेले दिसले.
प्रमुख निर्देशांक जरी काहीसे सावरले तरी शुक्रवारच्या सत्रात सकाळपासून बँका, वाहन उद्योग वगैरे व्याजदराबाबत संवेदनशील उद्योगक्षेत्रांमध्ये नरमाईची स्थिती कायम राहिल्याचे दिसून आले. सर्वाधिक भाव घसरलेल्या समभागांमध्ये एचडीएफसी, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, बजाज ऑटो यांची आघाडी दिसून आली. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणपश्चात धातू क्षेत्रातील समभागांची कामगिरी अधिक उजवी राहिल्याचे दिसून आले. शुक्रवारी बाजारातील सर्वाधिक चांगली भाव कामगिरी करणाऱ्या अव्वल सहापैकी चार समभाग हे धातू क्षेत्रातील होते. जिंदाल स्टील, स्टरलाइट, टाटा स्टील, हिंडाल्को यांचे भाव दीड ते पावणेतीन टक्के वधारले.