जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर येथील आघाडीच्या कंपन्यांच्या समाधानकारक तिमाही वित्तीय निष्कर्षांने सेन्सेक्समधील तेजी गुरुवारी विस्तारली. मुंबई निर्देशांकाला पुन्हा त्याच्या २० हजारांच्या वरच्या टप्प्यावर नेऊन ठेवत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्समध्ये दुसऱ्या दिवशी १८० अंशांची भर नोंदविण्यास भाग पाडले. कालच्या ९८ अंश वाढीनंतर गुरुवारच्या १७९.६८ अंश वधारणेमुळे सेन्सेक्स २०,१२८.४१ या ३० मे रोजीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६४.७४ अंश वाढीसह ६,०३८.०५ वर बंद झाला.
विविध १३ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे दुसऱ्या दिवशी स्वागत करताना भांडवली बाजाराने दुसऱ्या दिवशीही तेजी राखली आहे. कालच्या व्यवहारात जवळपास शतकी भर पडल्यानंतर आजच्या उत्साहवर्धक वातावरणामुळे सेन्सेक्स गेल्या दीड महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
त्यातच जागतिक भांडवली बाजारातील तेजीसह येथील एचडीएफसी बँक, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँकेच्या फायद्यातील निकालांच्या जोरावर सेन्सेक्स दिवसभर तेजीच्या हिंदोळ्यावर होता. त्याचबरोबर ओएनजीसी, रिलायन्स हे ४.४ टक्क्यांपर्यंत वधारले. चांगल्या पावसामुळे हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसीसारख्या समभागांचे मूल्यही वाढले. गुरुवारी भांडवली व्यवहारानंतर जाहीर होणाऱ्या टाटा समूहातील टीसीएसच्या समभागांमध्ये मात्र नफेखोरीमुळे घसरण झाली. सेन्सेक्समधील २३ समभाग वधारले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक तेजी बांधकाम निर्देशांकाने नोंदविली.