नव्या आवडय़ाची सुरुवात २० हजारांच्या वर करू पाहणाऱ्या मुंबई निर्देशांकालाही वाढत्या महागाईच्या चिंतेने या टप्प्यापासून खाली आणले. दिवसभरात ३५० हून अधिक अंशांची झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर किरकोळ वाढीसह २० हजारांपासून माघारी फिरला; तर अस्थिरतेच्या वातावरणातच निफ्टीत नाममात्र घट नोंदली गेली.
गेल्या सप्ताहाची अखेर सेन्सेक्सने १९,९७७.३८ अशी २० हजारांच्या काठावर केली होती. सोमवारच्या व्यवहाराची सुरुवातही दमदार राहिली. शुक्रवारच्या तुलनेत २४५ अंशांची दमदार वाढ नोंदवीत बाजार या वेळी २० हजारांच्या काठावर होता. लगेचच त्याने हा टप्पाही पार केला. तो २०,०७५ पर्यंत उंचावला. आधीच्या बंदच्या तुलनेत ही वाढ तब्बल ३५० अंशांहून अधिक होती. सरकारी रोख्यांमध्ये विदेशी कंपन्यांच्या गुंतवणूक मर्यादा शिथिल केल्याचा हा परिपाक होता. दुपारनंतर मात्र ऑगस्टमधील घाऊक किंमतवाढीचे आकडे जाहीर झाले आणि आठवडाअखेरच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्य तिमाही पतधोरणात व्याजदर कपात नाही या भीतीखातर गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. अखेर अवघ्या ९.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स १९,७४२.४७ वर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजारात मात्र १०.०५ अंश घसरणीसह ५,८४०.५५ वर स्थिरावला. बँक निर्देशांकाच्या आगेकूचसह सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक वधारले.

रॅनबॅक्सी ३० टक्क्यांनी आपटला
रॅनबॅक्सी लेबोरेटरीजच्या मोहाली प्रकल्पातून उत्पादित औषधांबाबत अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या या कंपनीचा समभाग सोमवारी थेट ३० टक्क्यांनी आपटला. समभागाला ३१८.८५ रुपयांचा भाव मिळाला.