विदेशातून संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला डॉलर-पौंडाचा पाऊस आणि निरंतर तेजीने स्थानिक गुंतवणूकदारांमध्ये भारलेला उत्साह या जोरावर सेन्सेक्सने गुरुवारी सलग सहाव्या दिवशी आणखी ७८ अंशांची वाढ नोंदवीत आपली स्वप्नवत भरारी कायम ठेवली. दिवसअखेरची सेन्सेक्सची २६,६३८.११ ही आजवरची सार्वकालिक उच्चांकी पातळी आहे, ती गेले चार दिवस सतत नव्या पातळीला गाठत आली आहे. निफ्टीनेही सलग तिसऱ्या दिवशी १८ अंशांची भर घालत ७,९५४.३५ असे अभूतपूर्व शिखर दाखविले. भांडवली बाजारात व्यवहाराचा हा ऑगस्ट महिन्यांतील शेवटचा दिवस होता आणि निर्देशांकांच्या लक्षणीय मासिक वाढीची मालिका  सलग सातव्या महिन्यात कायम राहिली आहे, हाही शेअर बाजाराच्या अलीकडच्या इतिहासातील एक विक्रमच आहे. अर्थसुधारणांच्या पथावर मोदी सरकारची वाटचाल बाजाराच्या पसंतीस उतरली असून, अनेक दलालपेढय़ांनी तेजीला नजीकच्या काळात खंड पडणे दृष्टीपथात नसल्याचे सांगताना, निर्देशांकांच्या उंचीबाबत अंदाज उत्तरोत्तर वाढवीत नेले आहेत.