महागाईवर नियंत्रणाऐवजी आर्थिक विकासाला रिझव्‍‌र्ह बँकेकडून प्राधान्य मिळेल, या अपेक्षेच्या झुळ्यावर सुरू झालेल्या गुंतवणूकदारांच्या हिंदोळ्यांनी सोमवारी भांडवली बाजारात सप्ताहारंभीच मोठा झोका घेतली. यातून सेन्सेक्सला आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३७५.७२ अंशांची म्हणजे २०१४ सालातील सर्वात मोठी झेप घेण्याचे बळ मिळाले. परिणामी निर्देशांक पुन्हा २१ हजारापल्याड पोहचला आणि दिवसअखेर २१,१३४.२१ वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १०१.३० अंश वाढीसह ६२७२.७५ पर्यंत पोहोचला. दोन्ही निर्देशांकांची गेल्या जवळपास दोन महिन्यांतील  एकाच दिवसातील ही सर्वात मोठी उडी ठरली.
रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत संभाव्य वाढीव व्याजदराची चिंता गुंतवणूकदारांनी नव्या आठवडय़ाच्या सुरुवातीला काहीशी दूर ठेवली. डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचे आकडे सोमवारऐवजी मंगळवारी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट होताच गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदीचे धोरण अवलंबिले. नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दर उणे २.१ टक्के असल्याचे चिंताजनक चित्र गेल्याच आठवडय़ात स्पष्ट झाले होते.
भांडवली बाजाराची सुरुवातच सकाळच्या सत्रात तेजीने झाली. एकदम २६४ अंश वाढ नोंदवीत सेन्सेक्स याचवेळी २१ हजार पार गेला. तेल व वायूसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची यावेळी खरेदी होत होती. क्षेत्रीय निर्देशांकातील आरोग्यनिगावगळता इतर सर्व ११ निर्देशांक तेजीत होते. बँक, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांनाही यावेळी मागणी होती. समभागांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक यांचे मूल्य वधारले.
व्यवहाराच्या सुरुवातीचा २०,८५०.५४ हा स्तर सेन्सेक्सचा दिवसातील नीचांक राहिला. २५ नोव्हेंबर २०१३ रोजी एकाच दिवसात सेन्सेक्समध्ये ३८७.६० अंशांची उसळी यापूर्वीची त्याची सर्वात मोठी कमाई होती. सोमवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभाग तेजीच्या यादीत होते.